जाहिरातीवरून केजरीवाल विरुद्ध भाजप संघर्ष

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांनी हवा तापली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांनी हवा तापली आहे. भारतीय जनता पक्षाने अरविंद केजरीवाल यांचे   ‘गोत्र’ उपद्रवी असल्याचा दावा करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आहे. हिंदी भाषीक पट्टय़ात गोत्राचा संबंध जातीशी आहे. त्यामुळे आपल्या गोत्राचा उल्लेख करून भाजपने समस्त अगरवाल समाजाची जात काढल्याचा आरोप करीत  केजरीवाल यांनी भाजपची कोंडी केली.
केजरीवाल यांनी गतवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या आंदोलनावर टिका करताना ‘आपका उपद्रवी गोत्र इसमे भी (प्रजासत्ताक दिन कार्यक्रम) व्यवधान डालने को तैयार था’ असा उल्लेख भाजपने जाहिरातीत प्रसिद्ध केला. भाजपने आपल्या जातीचा उल्लेख केल्याचा आरोप करीत केजरीवाल यांनी निवडणूक आयोगकडे तक्रार दाखल केली. जाहिरातीतून केलेला वार उलटल्याने भाजपने देखील केजरीवाल जनतेची  दिशाभूल करीत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल केली.
केजरीवाल म्हणाले भाजपने मर्यादा ओलांडली व माझ्या गोत्राचा उल्लेख करून समस्त अगरवाल समाजाचा अपमान केला आहे. केजरीवाल यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्या आरोपांचा इन्कार केला. गोयल यांच्याकडे ही जबाबदारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सोपवली होती.

‘आप’ ला सर्वाधिक जागा ?
आगामी निवडणुकीनंतर दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाला सर्वाधिक ३५ जागा मिळण्याचा अंदाज असून त्याखालोखाल भाजपला २९ जागा मिळण्याचा निवडणूकपूर्व अंदाज ‘एबीपी न्यूज-नेल्सन’ ने व्यक्त केला आहे. काँग्रेसला केवळ सहा जागांवरच समाधान मानावे लागेल, असेही त्यांच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.या सर्वेक्षणात ४८ टक्के दिल्लीकरांनी मुख्यमंत्रीपदासाठी अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली असून भाजपच्या किरण बेदी यांच्या बाजूने ४२ टक्के मतदारांनी पसंती दर्शविली आहे. २५ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत ३५ मतदारसंघांत ६,३९६ मतदारांना याद्वारे विचारणा करण्यात आली होती.

टंडन यांचे घुमजाव
किरण बेदी यांची वृत्ती हुकूमशाही असल्याचा आरोप करून बेदी यांचे प्रचार साहाय्यक नरेंद्र टंडन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मात्र काही वेळातच त्यांनी राजीनामा मागे घेतला. आपल्या स्वीय सहायकांना सांभाळणे ज्यांना कठीण झाले आहे, ते दिल्लीतील व्यवहार कसे काय पाहणार, असा सवाल करून काँग्रेसने करत बेदींवर टीका केली.

कार्यकर्ते वकिलांमध्ये चकमक
किरण बेदी यांच्या निवडणूक कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते आणि वकिलांमध्ये  चकमकीत तीन जण जखमी झाले.तीस हजारी न्यायालयातीलवकिलांविरोधात १९८८ मध्ये बेदी यांनी कारवाई केली होती. त्यावेळी बेदी उपायुक्त होत्या. त्यांच्या उमेदवारीविरोधात वकील निदर्शने करीत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Controversial bjp advertisement attacks arvind kejriwal

ताज्या बातम्या