नवी दिल्ली : राज्यातील महायुतीच्या जागावाटपावर तोडगा निघण्याऐवजी गुंतागुंत वाढू लागली आहे. दक्षिण मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, सातारा, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, शिर्डी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा मतदारसंघांविषयी वाद अजूनही कायम आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तिसऱ्यांदा दिल्लीवारी होत असली तरी, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक असल्यामुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत तरी या नेत्यांची शहांशी भेट झाली नव्हती. भाजपच्या बैठकीसाठी शनिवारी दुपारीच दिल्लीत दाखल झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागावाटपांचा तिढा एक-दोन दिवसांमध्ये सुटेल असा दावा केला.

साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले आग्रही असून शनिवारी फडणवीस यांनी उदयनराजेंची भेट घेतली. साताऱ्यामध्ये उदयनराजेंना उमेदवारी दिली गेली, तर या जागेवरील दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोडावा लागेल. त्याबदल्यात अजित पवार गटाला नवा मतदारसंघ दिला जाईल, की या गटाच्या वाट्याला येणारी एक जागा कमी होईल यावर शहांच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाऊ शकतो. शिरूरची जागा शिवसेनेची असली तरी आता ती अजित पवार गटाला गेल्यामुळे शिवाजीराव अढळराव-पाटील यांना शिंदे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील व्हावे लागणार आहे.

हेही वाचा >>>भूतानमध्ये वैद्यकीय सेवेसाठी भारताचे सहाय्य

अमरावतीत कोण?

भाजपने अमरावती व गडचिरोली या दोन्ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर अमरावतीतील विद्यामान अपक्ष खासदार नवनीत राणा यांना पक्षात प्रवेश देण्याबाबतही निर्णय घ्यावा लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा लढवण्याबाबत भाजप आग्रही असला तरी शिंदे गटानेही दावा केला आहे. महायुतीमध्ये भाजप २८-२९, शिवसेना शिंदे गट १२-१३ व राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट ४-६ जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मनसेलाही एक वा दोन जागा दिल्या जाणार असल्याने जागावाटपाचे सूत्र अधिक गुंतागुंतीचे झाल्याचे मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शनिवारी रात्री भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्रातील उर्वरित जागांवरील उमेदवारांवरही निर्णय घेण्यात आल्याचे समजते. पहिल्या टप्प्यासाठी २७ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असून भंडारा-गोंदिया व गडचिरोली या दोन जागांवरील उमेदवार भाजपने अजून जाहीर केलेले नाहीत. उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. भाजपने राज्यातील २० जागांवरील उमेदवारांची घोषणा केलेली आहे. महायुतीतील मतभेद मिटल्यानंतर उर्वरित उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे विदर्भातील उमेदवार जाहीर

हेही वाचा >>>लक्षद्वीपमध्ये भाजपचा अजित पवार गटाला पाठिंबा; राज्याबाहेरील एक जागा राष्ट्रवादीसाठी

●काँग्रेसने शनिवारी महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील विदर्भातील चारही जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. लोकसभा निवडणूक लढवण्यास फारसे इच्छुक नसलेले विकास ठाकरे यांनाच अखेर तिकीट देण्यात आले आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात ठाकरे रिंगणात उतरतील.

●रामटेकमध्ये रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यावर दोन दिवसांपूर्वी शिक्कामोर्तब करण्यात आले होते. येथून शिवसेनेच्या शिंदे गटाचे कृपाल तुमाने विद्यामान खासदार असले तरी शिंदे गटाकडून नवा चेहरा रिंगणात उतरवला जाण्याची शक्यता आहे.

●गडचिरोली-चिमूर मतदारसंघामध्ये नामदेव किरसान व नामदेव उसेंडी या दोन नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस होती. अखेर किरसान यांना काँग्रेसने संधी दिली आहे.

●भंडारा-गोंदियामध्ये प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा आग्रह काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने धरला होता. मात्र, पटोलेंनी नकार दिल्यामुळे पडोळेंना संधी देण्यात आली.

मनसेला दक्षिण मुंबई?

महायुतीमध्ये मनसेला सहभागी करून घेतले जाण्याची शक्यता असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपच्या वाट्याला येणारी दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाऊ शकते. या मतदारसंघातून बाळा नांदगावकर वा अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. मनसेने नाशिक व शिर्डी या दोन जागांची मागणी केल्याचे सांगितले जाते.