देशात गेल्या अनेक दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या २४ तासांत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ही वाढ आधीच्या रुग्णसंख्येत तब्बल २३ टक्के आहे. बुधवारी देशात ४६ हजार १६४ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून ६०७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “कृपया आपली काळजी घ्या कारण भारत सरकार विक्रीत व्यस्त आहे”, असा टोला राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

राहुल गांधी म्हणाले, ” करोनाची वाढती संख्या चिंताजनक आहे. पुढील लाटेत गंभीर परिणाम टाळण्यासाठी लसीकरणाला गती देणे आवश्यक आहे. कृपया आपली काळजी घ्या कारण भारत सरकार विक्रीत व्यस्त आहे.”

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. केरळमध्ये ओणमपासून संसर्गाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होत असताना, महाराष्ट्रातही करोनाची प्रकरणे वाढली आहेत. इतर राज्ये जिथे सक्रिय प्रकरणे जास्त आहेत त्यात कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.

७५ वर्षांतील संपत्ती मोदी विकत आहेत!

यापुर्वी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मोनेटायझेशन पाइपलाइन प्रकल्पावर राहुल गांधी आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदम्बरम यांनी तीव्र टीका केली होती. देशाने ७५ वर्षांत निर्माण केलेली संपत्ती विकून मोदी सरकार खासगी क्षेत्रामध्ये दोन-तीन उद्योजकांची मक्तेदारी निर्माण करीत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला होता.

रस्ते, रेल्वे, वीज अशा विविध क्षेत्रांतील सरकारी मालमत्ता खासगी क्षेत्राकडे भाडेतत्त्वाने देऊन पाच वर्षांत सहा लाख कोटी रुपये उभे केले जाणार आहेत, पण ते कोणाच्या ताब्यात जाणार आहेत हे सहज समजण्याजोगे आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. दोन-तीन उद्योजकांचा राहुल गांधी यांनी सातत्याने उल्लेख केला असला तरी त्यांनी नावे घेणे टाळले. गेल्या ७५ वर्षांत या देशात विकास झाला नाही असा आरोप भाजप करत असेल तर ही संपत्ती कुठून निर्माण झाली, असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.

मी करोनाच्या धोक्याबाबत सातत्याने बोलत आलो आहे, त्याची वारंवार टिंगल केली गेली. आता नॅशनल मोनेटायझेशन प्रकल्पाबाबतही मी सांगत आहे की, याचा देशावर खूप गंभीर परिणाम होऊ  शकेल. दोन-तीन उद्योजकांची मक्तेदारी निर्माण होईल व छोटे उद्योग संपुष्टात येतील. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.