Coronavirus Outbreak Marathi News देशात करोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अटोक्यात आलेला करोना आता पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १८ हजार ८१९ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. देशासोबत जागतिक करोना प्रकरणांमध्येही २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी करोनाची साथ संपली नसून ११० देशांमध्ये करोना वाढत असल्यचा धक्कादायक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केला आहे.

हेही वाचा- उदयपूर हत्या प्रकरण; आरोपीचे पाकिस्तानातील ‘दावत-ए-इस्लाम’ संघटनेशी संबंध

११० देशांमध्ये करोनाची प्रकरणे वाढत आहेत
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, करोनाच्या रुपात बदल झाला असला तरी करोना अद्याप संपलेला नाही. ११० देशांमध्ये करोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंताही गेब्रेयसस यांनी व्यक्त केली आहे. बीए.४ आणि बीए.५ या दोन ओमिक्रोनच्या प्रकारांचा करोना वाढीमध्ये मोठा हात असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. ११० देशांमध्ये करोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत त्यांमध्ये मुख्य: बीए.४ आणि बीए.५ ओमिक्रोनचे प्रकार आढळून येत आहेत.


देशात सक्रिय रुग्णांचा आकडा १ लाखाच्या पार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ५५५ इतकी झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत १३ हजार ८२७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. कालच्या तुलनेत आज करोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काल (बुधवारी) १४ हजार ५०६ नवीन करोनाबाधित आढळून आले होते. तर ३० जणांचा मत्यू झाला होता.