पीटीआय, नवी दिल्ली : ‘कोव्हॅक्सिन’ या करोना प्रतिबंधक लशीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी वर्धक मात्रा म्हणून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यासाठी ‘भारत बायोटेक’ कंपनीने देशाच्या औषध नियामकांकडून परवानगी मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या, कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या लशींची दक्षता मात्रा (प्रिकॉशन डोज) ज्यांनी पहिल्या मात्रेनंतर ९ महिने पूर्ण केले आहेत अशा १८ वर्षांवरील सर्वाना दिला जातो.

 ‘हैदराबाद येथील भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनची सुरक्षितता, प्रतिक्रियाजन्यता आणि रोगप्रतिकारक क्षमता यांचे मूल्यमापन करण्यासाठी २ ते १८ वर्षे वयोगटातील निरोगी स्वयंसेवकांसाठी वर्धक मात्रा म्हणून या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याकरिता भारताच्या औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) २९ एप्रिलला अर्ज केला होता’, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.