scorecardresearch

ओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा

ओमायक्रॉन आता समूह संसर्गाच्या टप्प्यावर आहे आणि अनेक महानगरांमध्ये तो प्रबळ असून तेथे बाधितांचे प्रमाण वेगाने वाढत आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा

देशात करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणू संसर्गाची साथ समूह संसर्गाच्या टप्प्यात असून अनेक महानगरांमध्ये रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याची माहिती ‘इन्साकॉग’ने प्रसिद्ध केली आहे.

‘इन्साकॉग’ने रविवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात ओमायक्रॉनच्या साथीबद्दलची माहिती देण्यात आली आहे. ओमायक्रॉनचे बहुतेक रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत, परंतु सध्या मात्र रुग्णालयात दाखल होणारे आणि अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धोका कायम आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे. संसर्गक्षमता अधिक असलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीए.२’ या उपप्रकाराचेही अनेक रुग्ण देशात आढळल्याचेही या अहवालात म्हटले आहे. 

ओमायक्रॉन आता समूह संसर्गाच्या टप्प्यावर आहे आणि अनेक महानगरांमध्ये तो प्रबळ असून तेथे बाधितांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. ओमायक्रॉनचा उपप्रकार ‘बीए.२’च्या रुग्णांची संख्या देशात लक्षणीयरीत्या वाढत आहे. परंतु आरटीपीसीआर चाचणीमध्ये विषाणूच्या तीन जनुकांपैकी एक जनुक आढळत नसल्याने (एस-जीन ड्रॉप आऊट) निष्कर्ष नकारात्मक येण्याची शक्यता या अहवालात वर्तवली आहे. अगदी अलीकडे आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बी.१.६४०.२’ या उपप्रकाराचे निरीक्षण केले

जात आहे. त्याचा जलद फैलाव झाल्याचा कोणताही पुरावा नाही आणि त्यात रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्याची क्षमता असली तरी, सध्या तरी हा प्रकार चिंताजनक नाही. आतापर्यंत, भारतात त्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असेही ‘इन्साकॉग’ने स्पष्ट केले आहे.

ओमायक्रॉन आता देशात समूह संसर्गाच्या टप्प्यात असून दिल्ली आणि मुंबईमध्ये त्याचा प्रभाव अधिक आहे, असे ‘इन्साकॉग’ने आपल्या ३ जानेवारीच्या अहवालामध्येही म्हटले होते. हाही अहवाल रविवारी प्रसिद्ध करण्यात आला.

भारतात ओमायक्रॉनचा फैलाव आता परदेशी प्रवाशांमार्फत नाही, तर अंतर्गत संक्रमणाद्वारे होईल आणि विषाणू संसर्गाच्या वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनुकीय क्रमनिर्धारणावर लक्ष ठेवण्यासाठी ‘इन्साकॉग’ सुधारित धोरण तयार करीत आहे.

पुढील पंधरवडय़ात तिसरी लाट शिखरावर

नवी दिल्ली : करोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण दर्शवणारे भारताचे ‘आर-व्हॅल्यू’

१४ ते २१ जानेवारी या आठवडय़ात आणखी १.५७ पर्यंत कमी झाले आहे. प्राथमिक विश्लेषणानुसार पुढील पंधरवडय़ात तिसरी लाट टोक गाढेल, असा इशारा आयआयटी, मद्रासमधील अभ्यासकांनी दिला आहे. एखादी बाधित व्यक्ती किती लोकांमध्ये संसर्ग पसरवू शकते, हे ‘आर-व्हॅल्यू’द्वारे सूचित होते. हे मूल्य १च्या खाली गेले तर साथ लवकरच संपेल असे मानले जाते.

मुंबईत प्रमाण ८८ टक्के

मुंबईतील करोनाबाधितांपैकी ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत, असे जनुकीय क्रमनिर्धारणातून निष्पन्न झाले आह़े  त्यामुळे मुंबईत ओमायक्रॉनचा समूह संसर्ग आधीच झालेला असल्याचे स्पष्ट झाले आह़े  दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत घट नोंदविण्यात येत आह़े  मुंबईत रविवारी २,५५० करोनाबाधित रुग्ण आढळल़े  जानेवारीतील ही नीचांकी दैनंदिन रुग्णनोंद आह़े

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection omicron virus accompanied by mutant viral infections akp

ताज्या बातम्या