नवी दिल्ली : देशात करोनाचे ‘आर’ मूल्य (रिप्रोडक्शन रेट) सप्टेंबरच्या मध्यावधीत प्रथमच १ च्या खाली गेले असून ते ०.९२ झाले आहे. सप्टेंबर मध्यावधीतील  ही स्थिती समाधानकारक व दिलासादायक असल्याचे संशोधकांचे मत आहे.

  मुंबई, कोलकाता, चेन्नई व बेंगळुरू यांचे आर मूल्य हे १ पेक्षा अधिक असून दिल्ली व पुणे या शहरांचे आर मूल्य १ च्या खाली गेले आहे. एक व्यक्ती किती जणांना संसर्ग करू शकते याचे अनुमान आर मूल्यावरून काढले जात असते. राज्य म्हणून विचार करता महाराष्ट्र आणि केरळ यांचे आर मूल्य १ च्या खाली गेले असून करोना रुग्णांची संख्या काही काळ वेगाने वाढत गेलेल्या राज्यांना हा मोठा दिलासा आहे, कारण या राज्यांमध्ये आतापर्यंत उपचाराधीन रुग्णांची संख्या अधिक होती. ऑगस्टअखेर आर मूल्य हे १.१७ होते ते ४-७ सप्टेंबर दरम्यान १.११ झाले होते. त्यानंतरच्या काळात हे मूल्य १ च्या खाली राहिले आहे.

चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथॅमेटिकल सायन्सेस या संस्थेचे सिताभ्रा सिन्हा यांनी सांगितले की, केरळ व महाराष्ट्र या राज्यांसाठी आर मूल्य १ च्या खाली जाणे ही आशादायी व चांगली बातमी आहे. कारण या राज्यांमध्ये आतापर्यंत उपचाराधीन रुग्णांची संख्या ही जास्त होती. सिन्हा यांनी आर मूल्य मोजणाऱ्या वैज्ञानिक गटाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईचे आर मूल्य अजूनही १.०९ म्हणजे एकपेक्षा अधिक आहे. चेन्नई १.११, कोलकाता १.०४, बेंगळुरू १.०६ या प्रमाणे आर मूल्य आहे.

मार्च ते मे या काळात हजारो लोक करोना संसर्गाने मरण पावले होते. ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान आर मूल्य हे ०.९४ होते. ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान ०.८६, १४-१९ सप्टेंबर दरम्यान ०.९२ होते. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, रुग्ण बरे होण्याचा दर हा सध्या ९७.७५ टक्के होता. साप्ताहिक सकारात्मकता किंवा संसर्ग दर २.०८ टक्के होता. गेले ८८ दिवस हा दर ३ टक्क्यांच्या खाली होता.

संसर्ग प्रसाराच्या वेगाचा अंदाज

‘आर’ मूल्य याचा अर्थ एखादी संसर्ग झालेली व्यक्ती सरासरी किती जणांना संसर्ग करते असा आहे. त्यातून विषाणूचा पसरण्याचा वेग समजत असतो. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते तसेच पायाभूत सुविधा अपुऱ्या पडल्या होत्या. त्यानंतर आर मूल्य खाली जाऊ लागले.