जगभरात ३,८०,००० लोकांना करोनाची लागण झाली असून तब्बल १६,००० जणांचे बळी करोनानं घेतले आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास ५,००० जणांचे बळी तर एकट्या इटलीत गेले आहेत. करोनाचा प्रसार ज्या गुणाकार पद्धतीनं होत आहे ते अत्यंत धोकादायक असून सध्या समोर आलेली आकडेवारी ही बाब स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जी आकडेवारी दिली आहे ती सांगते की, पहिल्या ६७ दिवसांमध्ये करोना व्हायरसची एक लाख लोकांना लागण झाली. ही लागण सुरूवातीला चीनपुरता मर्यादित होती. नंतरच्या अवघ्या ११ दिवसांमध्ये आणखी एक लाख लोकांना करोना विषाणूची बाधा झाली. याचा अर्थ पहिल्या एक लाख लोकांना बाधा होण्यासाठी ६७ दिवस लागले, मात्र नंतरच्या एक लाख लोकांना लागण होण्यासाठी अवघे ११ दिवस पुरले. इटलीत ज्या वेगाने करोनाचा प्रसार झालाय त्यावरून या विषाणूच्या धोक्याचं गांभीर्य लक्षात येतं.

या पेक्षा जास्त धक्कादायक बाब म्हणजे WHO च्या सांगण्यानुसार या नंतरच्या दोन लाखांनंतरच्या एक लाख लोकांना करोनाची लागण होण्यासाठी व एकूण आकडा तीन लाखांवर जाण्यासाठी अवघे चार दिवस लागले. याचा अर्थ जसे दिवस जातील तसं गुणाकार पद्धतीनं करोनाची लागण झालेले बाधित वाढतात. इटलीमध्ये फेब्रुवारीच्या मध्यात अवघ्या तिघांना करोनाची लागण झाली होती. परंतु आता अवघ्या दीड महिन्यांत इटली युरोपमधला करोनाचा केंद्रबिंदू आहे. हा करोना विषाणू अत्यंत भीतीदायक वेगानं पसरतोय असा इशारा  WHO नं वारंवार दिला आहे. हाती आलेले आकडे हे करोनाची लागण झालेल्यांचे व ज्यांची चाचणी केली अशांचे आहेत. परंतु प्रचंड संख्येनं ज्या देशांत नागरिक आहेत व तपासणीची पुरेशी सुविधा नाही अशा देशांमध्ये तर हे कळण्यासच मार्ग नाही की हा धोका किती मोठा आहे आणि किती जणं करोनाच्या संपर्कात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

WHO चे प्रमुख टेड्रोस अधनॉम यांच्या सांगण्यानुसार अनेक देश पुरेशा स्त्रोतांच्या व संसाधनांच्या अभावी आवश्यक ती उपाययोजना करू शकत नाहीयेत. अनेक देशांमध्ये तर चाचणीचीही पुरेशी सुविधा नाहीये. भारताचा विचार केला तर भारतात ४०० पेक्षा जास्त करोना बाधित आढळले असून सरकारी हॉस्पिटलांची यंत्रणा पुरेशी नाहीये. परिणामी आता खासगी रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरूवात झाली आहे. देशातील २० राज्ये व केंद्रशासित प्रदेश अंशत: बंद करण्यात आले आहेत, परंतु संचारबंदी असूनही मुंबईसारख्या शहरांमध्येही लोकं मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरताना व गर्दी करताना दिसत आहेत. परिणामी ही साथ आटोक्यात कशी राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.