करोना व्हायरस रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असताना देशात पाचव्या मृत्यूची नोंद झाली आहे. इटलीहून भारतात आलेल्या ६९ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारतात सापडलेल्या करोना रुग्णांच्या पहिल्या बॅचमध्ये या नागरिकाचा समावेश होता. ह्दय बंद पडल्याने राजस्थानमधील जयपूरमध्ये या नागरिकाचा मृत्यू झाला. “६९ वर्षीय इटालियन नागरिकाचा ह्रदय बंद पडल्याने जयपूरमधील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे,” अशी माहिती पीटीआयने रुग्णालयातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनसुार, रुग्णावर यशस्वी उपचार झाले होते आणि करोनातून त्यांची मुक्तता झाली होती. पण त्यांचा मृत्यू करोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्यसंबंधी कारणांमुळे झाला की नाही याबद्दल स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. आतापर्यंत भारतात करोनाची लागण झाल्याची २०४ प्रकरणं आली असून चार मृत्यूंची नोंद झाली आहे. हे चार मृत्यू दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यू झालेल्या सर्व व्यक्ती ६० किंवा त्याहून जास्त वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत.
भारतात सर्वात आधी करोनाचे रुग्ण सापडले त्यामध्ये इटलीच्या १६ पर्यटकांचा समावेश होता. यामधील वयस्कर दांपत्यावर जयपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. तर इतर १४ जणांना दिल्लीमधील मेदांता रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं होतं. यामध्ये पर्यटकांसोबत असणाऱ्या भारतीय गाईडचाही समावेश होता. त्याच्यावर दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु आहेत.