लॉकडाउन जाहीर करण्यात आला असल्याने सध्या अनेक राज्यातील लोक दुसऱ्या राज्यांमध्ये अडकले आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यांनी आपल्या सीमा सील केल्या असल्याने या नागरिकांकडे आहोत तिथे थांबण्याशिवाय पर्याय नाही. परराज्यातील या नागरिकांना राज्य सरकारकडून शक्य ती सर्व मदत दिली जात आहे. अशाच पद्धतीने नवी मुंबईत अरुणाचल प्रदेशमधील काही विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पोलीस पुढे सरसावले असून त्यांना गरजेच्या वस्तू पुरवण्यात आल्या आहेत. याबद्दल अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी नवी मुंबई पोलीस सहआयुक्त राजकुमार व्हटकर यांचे आभार मानले आहेत.

पेमा खांडू यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “अरुणाचल प्रदेशमधील अडकलेल्या २० विद्यार्थी आणि इतरांना रेशन, औषधं तसंच इतर महत्त्वाच्या गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेणारे नवी मुंबईचे पोलीस सहआयुक्त राजकुमार व्हटकर यांचे आभार”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री पेमा खांडू ट्विटरवर सक्रीय असून इतर राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांची योग्य ती काळजी घेतली जात आहे की नाही यावर सतत लक्ष ठेवून आहेत. इतकंच नाही तर मदत करणाऱ्या सर्वांचे ट्विटरच्या माध्यमातून आभारही मानत आहेत. याआधी पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशमधील विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल पुणे पोलीस आणि सहआयुक्त डॉ रविंद्र शिसवे यांचे आभार मानले होते.