करोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आल्याने उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. हातावर पोट असणारे अनेकजण बेरोजगार झाले असून उपासमार होत आहे. अनेक कामगारांनी यामुळे आपल्या घऱी जाण्यासाठी शेकडो किलोमीटरच पायी प्रवास सुरु केला आहे. मात्र आग्रा येथे एका तरुणाने हातात काहीच काम नसल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मूळचा मेघालयाचा असणाहा हा तरुण आग्रा येथील एका रेस्तराँमध्ये कामाला होता. ३० मार्च रोजी त्याने आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने भाड्याने राहत असलेल्या घऱातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाचं नाव एल्ड्रिन लिंगदोह असं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्याने आपल्या मालकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर आपल्या मालकाने मदत करण्यास सरळ नकार दिला. आपण शिलाँगमध्ये चोरी करायचो. पण चांगलं आयुष्य जगण्याच्या हेतूने शहर सोडलं होतं असंही तरुणाने सांगितलं आहे.
फेसबुक पोस्टमध्ये तरुणाने काय लिहिलं आहे –
“माझं नाव एल्ड्रिन लिंगदोह आहे. माझा जन्म गरिब कुटुंबात झाला. आईच्या मत्यूनंतर स्वत:साठी काहीतरी करायचं म्हणून मी शहरातून बाहेर पडलो. मी शिलाँगमध्ये चोरी करायचो. पण चांगलं आयुष्य जगण्यासाठी मी तिथून निघालो. मी आग्रा येथील सिकंदरा कारगील शांती फूड कोर्ट रेस्तराँमध्ये काम करतो. मोदींनी माझ्यासाठी सर्व रस्ते बंद केले आहेत. दुसरीकडे कुठेच जाण्याचा पर्याय माझ्याकडे नाही. मी कुठे जाऊ ? माझ्या मालकालाही माझ्यावर दया येत नाही. मालकीण सीमा चौधरी यांनी मला जिथं हवं असेल तिथे निघून जा असं सांगितलं आहे. कृपया मला मदत करा. कुठे जायचं मला काहीच कळत नाही आहे. मला फक्त एकच मार्ग दिसत आहे तो म्हणजे आत्महत्या. मला तुमच्याकडून मदत हवी आहे. माणुसकी शिल्लक असेल तर माझा मृतदेह माझ्या घऱी पोहोचवा जेणेकरुन मला शांती लाभेल. आज मी या जगात नसेन. कृपया माझी मदत करा. मी मस्करी करत नाही आहे,” असं तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पोलिसांनी फेसबुक पोस्टच्या आधारे सीमा चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
