scorecardresearch

मोदींची जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा; ट्विट करत म्हणाले…

अमेरिकेकडून भारताला मदतीचं आश्वासन देण्यात आलं आहे

मोदींची जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा; ट्विट करत म्हणाले…
संग्रहित ((Photo: Twitter/NarendraModi))

अमेरिकेने कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याची ग्वाही दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसलेला असून दैनंदिन रुग्णसंख्या तीन लाखांच्या पुढे गेली असताना युरोपिअन युनिअन, जर्मनी, फ्रान्, इंग्लंड तसंच अनके देश मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. यानंतर अमेरिकेनेही भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं असून दोन्ही देशांमधील स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. तसंच मदतीचं आश्वासन दिल्याबद्दल आपण जो बायडन यांचे आभार मानल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

करोना संकटात भारताला मदत करण्यासंबंधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

“जो बायडन यांच्याबरोबरील चर्चा फलद्रुप झाली. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या करोना स्थितीवर आम्ही सविस्तर चर्चा केली. अमेरिकेकडून भारताला देण्यात आलेल्या सहकार्याबद्दल मी जो बायडन यांचे आभार मानले,” असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याशिवाय भारताकडून करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी भारताकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांवरही चर्चा झाली.

अमेरिकेकडून भारताला व्हेंटिलेटर, कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल तसंच इतर साधनसामग्री पुरवली जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

जगभरातून मदतीचा हात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी करोनाशी लढण्यासाठी भारताला आणि भारतीयांना वैद्यकीय साहित्यासोबतच सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. जो बायडन यांनी सोमवारी ट्विट करत, “ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेला करोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती असताना मदत केली त्याचप्रमाणे आम्ही भारताला गरज असताना मदत करण्याचं ठरवलं आहे” असं म्हटलं. आपला सहकारी भारताला मदत देण्यास उशीर करत असल्याने भारतीय अमेरिकी तसंच पक्षातील काही सहकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

करोना लसीच्या निर्मितीसाठी कच्चा माल पुरवणार
अमेरिकेनं भारताला लसी निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचं मान्य केलं आहे. बायडेन प्रशासनाकडून भारताला ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली.

लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली होती. त्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेना भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लस निर्मितीची अडचण दूर होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या