#Stupidity: “करोना नाही पण हा मूर्खपणा भारतीयांना एक दिवस नक्की संपवणार”

करोनाची लागण होऊ नये यासाठी घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं जात असताना लोक रस्त्यावर अक्षरश: नाचत होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी पाच वाजता घराच्या बाल्कनीत, दरवाज्यात उभं राहून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवत आभार मानण्याचं आवाहन केलं आणि सगळे देशवासी एकत्र आले. मोदींनी केलेल्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. पण मिळालेला हा प्रतिसाद कौतुकास्पद कमी आणि भयानक जास्त होता. एकीकडे करोनाची लागण होऊ नये यासाठी घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं जात असताना लोक रस्त्यावर अक्षरश: नाचत होते. यामुळे एकीकडे पाच वाजेपर्यंत जनता संचारबंदीला सकारात्मक प्रतिसाद देणारे नागरिक आणि दुसरीकडे रस्त्यावर जमलेली गर्दी असा विरोधाभास निर्माण करणारं चित्र होतं.

सोशल मीडियावर यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत असून करोनाबद्दल आपण अद्यापही जागरुक नसल्याचं यातून स्पष्ट होत असल्याचं बोललं जात आहे. ट्विटरवर तर #stupidity हा ट्रेंडच सुरु आहे.

विशेष म्हणजे रविवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जनता संचारबंदीचं आवाहन करण्यात आलं होतं. या संचारबंदीला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शहरांमधील गजबजलेल्या अनेक रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. यामुळे लोकांमध्ये करोनासंबंधी भीती आणि जनजागृती असल्याचं दिसत होतं. पण संध्याकाळी पाच वाजता लोक घराबाहेर पडले आणि आपण अद्यापही करोनाबाबतीत गंभीर नसल्याचं स्पष्ट झालं.

ट्विटरवर एका युजरने तर करोना नाही पण हा मूर्खपणा भारतीयांना एक दिवस नक्की संपवणार अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.

एकाने तर करोना नाही तर माणूस खऱा व्हायरस असल्याचं म्हटलं आहे.

भारतात सध्या करोनाचे एकूण ३९३ रुग्ण सापडले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. रविवार ते सोमवार सकाळ या कालावधीत हा आकडा वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या ही ८९ झाली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus stupidity trend on twitter sgy

ताज्या बातम्या