Mumbai Customs Drug Smuggling Case: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने एका जोडप्याला पाच कोटी रुपयांचा गांजा कोलंबोहून आणल्याच्या आरोपाखाली अटक केली. नवी मुंबईत राहणारे हे जोडपे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) कोलंबोहून परतल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. मोहम्मद सौद सिद्दिकी (२९) आणि सना सिद्दिकी (२७) असे अटक करण्यात आलेल्या जोडप्याचे नाव असून ते नवी मुंबईत राहणारे आहेत. आपली फसवणूक झाली असल्याचे या जोडप्याने न्यायालयात म्हटले आहे.
जोडप्याने न्यायालयात आपली बाजू मांडताना म्हटले की, सोशल मीडियावरून त्यांना कोलंबोची मोफत सहल देणारी ऑफर मिळाली. कोलंबोहून परत येत असताना मोफत सहल देणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याकडे एक पार्सल दिले होते. या पार्सलमध्ये काय आहे, याची त्यांना कल्पना नव्हती.
विमानतळ सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटला सदर जोडपे ट्रॉली बॅगेत काहीतरी वस्तू घेऊन येणार असल्याची गुप्त वार्ता मिळाली. जोडपे जसे विमानतळावर आले, तसे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या बॅगेत तीन हवाबंद पाकिटे आढळून आले. फिल्ट टेस्टिंग कीटद्वारे पाकिटातून वस्तूची तपासणी केली असता त्यात पाच किलो वजनाचे बंदी असलेले हायड्रोपोनिक तण (गांजा) आढळून आले. याची बाजारातील किंमत ५.४५ कोटी असल्याचे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
न्यायालयात जोडप्याची बाजू मांडणाऱ्या वकील सुनील तिवारी यांनी म्हटले की, या जोडप्याला नाहक गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना सोशल मीडियावर संपर्क साधून कोलंबोला मोफत प्रवास घडवून देण्याची ऑफर दिली. त्यांनी प्रक्रिया पूर्ण करत व्हिसा मिळवला आणि श्रीलंकेला भेट दिली. परत येत असताना मोफत प्रवास घडवून देणाऱ्या व्यक्तीने त्यांना चॉकलेटचे पार्सल दिले आणि मुंबईत पोहोचवण्याचा संदेश दिला. त्या पार्सलमध्ये प्रतिबंधित वस्तू होत्या, याची त्यांना कल्पना नव्हती.
नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याअंतर्गत या जोडप्याला अटक करण्यात आली आहे. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता २८ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.