प्रशासन, महापालिका, रेल्वे, पोलीस अधिकारी यांच्यावर ठपका

सुमारे ६० जणांचे बळी घेणाऱ्या अमृतसर रेल्वे अपघाताची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी पूर्ण झाली असून, त्यात अपघातस्थळानजीकच्या दसरा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असलेल्या पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे.

या अपघाताची चौकशी करण्यासाठी सरकारने जालंधरचे विभागीय आयुक्त बी. पुरुषार्थ यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमले होते. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करणारे एका काँग्रेस नगरसेवकाचे चिरंजीव, अमृतसर जिल्हा प्रशासनाचे तसेच महापालिका, रेल्वे आणि स्थानिक पोलीस यांच्या अधिकाऱ्यांवर या घटनेसाठी ठपका ठेवला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

गेल्या १९ ऑक्टोबर रोजी जमाव जोदा फाटकाजवळ रावणप्रतिमेच्या दहनाचा कार्यक्रम बघत असताना एका प्रवासी गाडीने त्यांना चिरडले होते. या अपघाताच्या दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा ३०० पानांचा अहवाल पंजाबच्या गृह सचिवांना गेल्या महिन्यात सादर करण्यात आला.

काँग्रेसच्या नगरसेवकांचे पुत्र आणि सिद्धू दाम्पत्याचा जवळचा सहकारी सौरभ मिठू मदन याने कार्यक्रमस्थळी लोकांच्या सुरक्षेची निश्चिती करायला हवी होती, यावर अहवालात भर देण्यात आला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमाबाबत योजलेले सुरक्षेचे उपाय आणि या कार्यक्रमासाठी दिलेली परवानगी यासाठी अहवालात अमृतसर प्रशासन आणि महापालिका यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. रेल्वे मार्गावर प्रचंड मोठा जमाव असताना जलद गाडीला हिरवा सिग्नल दिल्याबद्दल रेल्वेच्या भूमिकेवरही अहवालात प्रश्नचिन्ह लावण्यात आले आहे. गृह मंत्रालयाने या अहवालाशी संबंधित फाइल मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवली आहे.

‘निष्काळजीपणा जबाबदार’

उल्लेखनीय म्हणजे, रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी केलेल्या या अपघाताच्या चौकशीत रेल्वे मार्गावर उभ्या असलेल्या लोकांचा ‘निष्काळजीपणा’ या दुर्दैवी घटनेसाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते.