पीटीआय, लाहोर : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात अटक करण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेली मोहीम गुरुवापर्यंत थांबवावी, असा आदेश पाकिस्तानच्या एका न्यायालयाने बुधवारी दिल्यामुळे खान यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने पोलिसांच्या मोहिमेला मंगळवारी लाहोर उच्च न्यायालयात आव्हान देऊन, ही मोहीम थांबवण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती केली होती.

 पीटीआयचे नेते फवाद चौधरी यांनी सादर केलेल्या या याचिकेवर लाहोर उच्च न्यायालयाने पंजाबचे पोलीस महानिरीक्षक, मुख्य सचिव आणि इस्लामाबाद पोलीस यांना पाचारण केल्यानंतर पोलिसांनी बुधवारी ही मोहीम थांबवली. ‘तोशाखाना भेटवस्तू प्रकरणात इस्लामाबाद पोलिसांनी इम्रान खान यांचे अटक वॉरंट आणल्यामुळे पोलिसांना ही मोहीम हाती घ्यावी लागली, असे पंजाबचे पोलीस महानिरीक्षक उस्मान अन्वर यांनी न्यायालयापुढे हजर होऊन सांगितले. आम्हाला कायद्यानुसार या आदेशाचे पालन करावे लागले,’ असे त्यांनी सांगितल्याची माहिती न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

अटक वॉरंटला आव्हान

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जारी करण्यात आलेले अटक वॉरंट स्थगित करावे, अशी मागणी करणाऱ्या इम्रान खान यांच्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ज़ाफर इक्बाल यांनी सोमवारी या प्रकरणात इम्रान खान यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करून त्यांना १८ मार्चला न्यायालयात हजर करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. या आदेशाला खान यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपण ठरलेल्या तारखेला उच्च न्यायालयात हजर राहू असे शपथपत्र त्यांनी आपल्या वकिलांमार्फत दाखल केले आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवासस्थानाकडे जाणारे रेंजर्स, पोलीस यांची माघार

इम्रान खान यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे कूच करणारे पाकिस्तान रेंजर्स व पोलिसांनी बुधवारी मागे हटण्यास सुरुवात केल्यामुळे इम्रान समर्थकांनी जल्लोष करत विजयोत्सव सुरू केला. परदेशी खेळाडूंच्या सहभागाने सध्या सुरू असलेली पाकिस्तान सुपर लीग-८ क्रिकेट स्पर्धा संपेपर्यंत पोलीस खान यांच्या झमन पार्कमधील निवासस्थानात शिरणार नाहीत, असे आहे.