करोनामुक्त राज्य म्हणून घोषित झालेल्या गोव्यात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्याने चिंता वाढली आहे. यादरम्यान गोव्यात नियमांमध्ये बदल करण्यात आलेले असून राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची चाचणी बंधनकारक नसणार आहे. राज्यातून आणि राज्याबाहेरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिवसभर बैठका सुरु होत्या. आधीच्या चाचण्यांचे रिपोर्ट प्रलंबित असताना, नागरिकांची संख्या वाढत असल्याने प्रत्येकाची करोना चाचणी करणं अवघड होऊ लागलं असल्याचं प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे. "जवळपास २५०० जणांचे करोना चाचणी रिपोर्ट येणे बाकी आहेत. आम्ही दिवसला दीड ते दोन हजार चाचण्या करत असून त्या कायम असणार आहेत. पण राज्यात प्रवेश कऱणाऱ्यांसाठी आम्हाला मानक कार्यप्रणालीत (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) बदल करणं गरजेचं आहे," अशी माहिती त्यांनी दिली. "राज्यात प्रवेश कऱणाऱ्या व्यक्तीला १४ दिवस होम क्वारंटाइन होण्याचा पर्याय उपलब्ध असेल. यादरम्यान त्यांच्या सर्व हालचालींवर स्थानिक प्रतनिधींकडून लक्ष ठेवण्यात येईल. जर एखाद्या व्यक्तीला घरी जायचं नसेल तर त्याच्यासाठी संस्थात्मक क्वारंटाइनचा पर्यायही आहे. त्यासाठी शुल्क मोजावे लागेल. तिसरा पर्याय म्हणजे जर एखादी व्यक्ती फक्त काही दिवसांसाठी राज्यात येत असेल तर दोन हजार रुपयांत करोनाचा चाचणी करु शकतो," अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली आहे. "नव्या नियमावलीनुसार, राज्या प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्कॅनिंग केलं जाणार आहे. विमानतळं, रेल्वे स्थानकं, रस्त्यांवर हे स्कॅनर लावण्यात येणार आहेत. जर एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणं आढळली तर त्याची चाचणी करणं अनिवार्य असणार आहे," असंही यावेळी त्यांनी सांगितलं. १० जूनपासून नवे नियम लागू होणार आहेत.