देशात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. करोनावरील आजारासाठी तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत बायोटेकनं आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरद्वारे ही लस लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी भारत बायोटेकच्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीसाठी मान्यता देण्यात आली होती. आयसीएमआरकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार ७ जुलैपासून मानवी चाचणीसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. यानंतर सर्व चाचण्या योग्यरित्या पार पडल्या तर १५ ऑगस्टपर्यंत ही लस लाँच करण्यात येईल. असं झाल्यास सर्वप्रथम भारत बायोटेकची COVAXIN ही लस करोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध होणार आहे.

आणखी वाचा- बापरे… एका दिवसात देशात आढळले २० हजाराहून अधिक करोनाबाधित

हे पत्रक आयसीएमआर आणि सर्व स्टेकहोल्डर्स (ज्यामध्ये एम्सच्या डॉक्टरांचाही समावेश आहे) यांनी मिळून जारी केलं आहे. जर प्रत्येक टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली तर १५ ऑगस्टपर्यंत COVAXIN ही लस बाजारात उपलब्ध होऊ शकते, असं त्यात म्हणण्यात आलं आहे. आयसीएमआरकडून सध्या याबाबत केवळ शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आणखी वाचा- Good News : देशात दुसरी करोना लसही तयार; लवकरच मानवी चाचणी होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली होती. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली होती. त्यानंतर भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली. “एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळे करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली,” असं कंपनीनं निवेदनात म्हटलं होतं.