बीजिंग, शांघाय : चीनच्या पूर्व भागातील शांघाय शहरात एकाच दिवसात करोनामुळे ५१ मृत्यू झाल्याची नोंद झाली असून या भागात सलग चौथ्या आठवडय़ातही ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्याचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. बीजिंगमध्येही करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सोमवारी या शहराच्या उच्चभ्रू भागात करोनाच्या मोठय़ा प्रमाणावर चाचण्या केल्या जात आहेत. तेथे सुमारे ३५ लाख लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत.

देशातील अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, करोनाचा नव्याने प्रादुर्भाव झाल्यानंतर बीजिंगच्या चाओयांग जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर रुग्ण नोंदले गेले आहेत. या भागाची लोकसंख्या सुमारे ३५ लाख असून तेथे नागरिकांच्या न्यूक्लिक अ‍ॅसिड चाचण्या तीन वेळा केल्या जाणार आहेत. ही मोहीम सोमवारपासून हाती घेण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले. जे या जिल्ह्यात राहतात किंवा काम करतात, त्या सर्वाच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. सोमवारप्रमाणेच बुधवारी आणि शुक्रवारीही चाचण्या केल्या जाणार आहेत, असे रविवारी जिल्हा रोगनियंत्रण पथकाने जाहीर केले होते.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी जारी केलेल्या अहवालानुसार, रविवारी बीजिंगमध्ये १४ रुग्ण नोंदले गेले, त्यापैकी ११ जण चाओयांग जिल्ह्यातील आहेत. हा शहराचा मध्यवर्ती असून तेथे चीनचे उच्चपदस्थ नेते राहतात.

दिवसभरात २०,१९० रुग्ण

चीनमध्ये रविवारी करोनाचे २०,१९० नवे रुग्ण नोंदले गेले. त्यातील बहुसंख्य हे लक्षणेविरहित आहेत. सुमारे २६ दशलक्ष लोकसंख्येच्या शांघायमध्ये २४७२ करोना रुग्ण आढळले आहेत. चालू प्रादुर्भावात या शहरातील करोनाबळींची संख्या रविवारी १३८ झाली आहे. त्यापैकी ५१ मृत्यू रविवारी नोंदले गेले. हे एकाच दिवसातील सर्वाधिक बळी आहेत. आता चीनमधील एकूण करोनाबळी ४,७७६ झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शांघायव्यतिरिक्त अन्य १७ प्रांतांतही करोनाचे नवे रुग्ण नोंदले जात आहेत. देशभरात २९,१७८ करोना रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.