करोनाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा कसाबसा बाहेर येत असतानाच दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेसमोर मोठं संकट उभं राहिले आहे. शेअर बाजारात दररोज याचे परिणाम दिसून येत आहे. देशात आज निर्माण झालेल्या स्थितीवर भाष्य करताना शिवसेनेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष रुझवेल्ट यांनी घेतलेल्या निर्णयांकडे बोट दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. तसेच देशाला आज एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवे आहेत असंही त्यांनी नमूद केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाची दुसरी लाट, ढासळती अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारी यावर संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ सदरातून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खडेबोल सुनावले आहेत. “शेअर बाजार कोसळणे हे आता नवीन राहिलेले नाही. मुकेश अंबानी यांच्या घराच्या मैलभर परिसरात जिलेटिन कांड्या असलेली एक गाडी सापडली, ते कारणही शेअर बाजार कोसळून पडायला पुरेसे ठरते. इतकी आपली अर्थव्यवस्था ठिसूळ पायावर उभी आहे. पूर्वी युद्ध किंवा महायुद्धामुळे अर्थव्यवस्था कोसळत असे. आता करोना संकटामुळे शेअर बाजाराची रोजच पडझड सुरू झाली आहे. आपल्याच देशात नाही, तर जगभरातच एक भयानक मंदीची लाट आली आहे. भारतासारख्या देशात उत्पादनाचा वेग घटला आहे. लोकांनी नोटाबंदीच्या काळात नोकऱ्या गमावल्याच होत्या. आता लॉक डाऊनमध्ये उरलेल्या लोकांनीही नोकऱ्या गमावल्या. बाजारात हालचाल नाही. लोकांची पैसे खर्च करण्याची क्षमता संपली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे,” असं सांगत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या अर्थमंत्रीपद दुसऱ्या व्यक्तीकडे देण्याचा सल्ला दिला आहे.

“आज देशातील ६० टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत. पंतप्रधान मोदी हे एक राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक चांगले अर्थतज्ञ त्यांना सोडून गेले आहेत. गुजरात हा व्यापाऱ्यांचा प्रदेश आहे. ”हम बनिया लोग है” असे ते लोक अभिमानाने सांगतात. मोदी यांनीही ”आपण व्यापारी आहोत” असे वारंवार सांगितले, पण व्यापारीच दुकान थंडा करून बसले आहेत. २९ ऑक्टोबर १९२९ रोजी अमेरिकेतील वायदे बाजार कोसळला आणि तेथे एक भयानक मंदीची लाट आली, पण वर्षभर अगोदर तेव्हाचे अध्यक्ष हुवर यांनी अमेरिकन काँग्रेसला पाठविलेल्या संदेशात मात्र देशात आबादीआबाद असल्याचे म्हटले होते. तेच राजकीय वातावरण आज आपल्या देशातही आहे. इस्पितळे व राजकारण सोडले तर आपल्या देशात काहीच सुरू नाही. स्मशाने, कब्रस्तानेदेखील चोवीस तास सुरू आहेत. स्मशानांत लाकडांची टंचाई आहे व कब्रस्तानात जमीन कमी पडत आहे. हे आबादीआबाद असल्याचे लक्षण नाही,” असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

“…हे काही कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील ‘रेमडेसिवीर’ उपचार नव्हेत”

“मंदीतून सावरण्यासाठी अर्थव्यवस्थेस उभारणी देण्यासाठी आपण नक्की काय करीत आहोत यावर देशाचे पंतप्रधान व अर्थमंत्री काहीच बोलायला तयार नाहीत. प. बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी नक्कीच हरतील, असे मोदी सांगतात. हे काही कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील ‘रेमडेसिवीर’ उपचार नव्हेत. महाराष्ट्राचे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळेल, असे अमित शहा म्हणतात. हासुद्धा मंदी व बेरोजगारीच्या प्रश्नावरचा उतारा नाही. देशाच्या अर्थमंत्री तर कुठेच दिसत नाहीत. अमेरिकेत मंदी असताना तेव्हाचे राज्यकर्ते आत्मसंतुष्ट होते, आत्मप्रौढीत मशगूल होते. १९३० च्या जूनमध्ये एक शिष्टमंडळ अध्यक्ष हुवर यांना भेटून परिस्थितीची कल्पना देण्यासाठी गेले, पण हुवर त्यांना म्हणाले, ”मित्रांनो! तुम्ही दोन महिने उशिरा आलात. कारण मंदी दोन महिन्यांपूर्वीच संपली!” वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती, पण राजकारणी लोकांना दोष का द्यावा? वायदे बाजार कोसळण्याच्या काही दिवस अगोदर सर्व आलबेल असल्याची ग्वाही हॉर्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र्ज्ञांच्या एका समितीने दिली होती. या अर्थशास्त्र्ज्ञांना वायदे बाजार कोसळणार व आर्थिक मंदी येणार याची कल्पना नव्हती. पुढे त्यांची संस्था बंद पडली,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“देशाला आजचे संकट दूर करण्यासाठी एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा”

“तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष हुवर हे जरी आत्मसंतुष्ट होते तरी त्यांचे विरोधक, जे फ्रँकलिन रुझवेल्ट, ते नव्हते. त्यांनी अध्यक्षीय निवडणूक लढवली आणि सरकारी खर्चात कपात, उत्पादन वाढ आणि बेकार, निराश्रित यांना सहाय्य असा कार्यक्रम मांडला. त्यांनी यावर निवडणूक जिंकली. अर्थात अमेरिकेच्या अर्थव्यवहाराला गती आणण्यासाठी त्यांना सरकारी खर्चात कपात न करता प्रचंड वाढ करावी लागली. मोठमोठी सार्वजनिक कामे त्यांनी हाती घेतली. त्यामुळे रोजगार वाढला, उत्पादन वाढले. प्रचंड धरणे, रस्ते, वीज उत्पादन ही कामे त्यांनी हाती घेतली. रुझवेल्ट यांनी अमेरिकेतील अत्यंत हुशार, लोकहितदक्ष अशा बुद्धिमान लोकांचे वर्तुळ स्वतःभोवती जमवले. त्यात मार्गेन्थॉ, लिविस डग्लस, हॅरी हॉपकिन्स यांसारखे होते. आपला नवा आर्थिक कार्यक्रम रुझवेल्ट यांनी जाहीर केला. तेव्हा आठ दिवस अमेरिकेच्या बँका बंद होत्या. आठ दिवसांनी प्रे. रुझवेल्ट यांनी आकाशवाणीवरून त्यांची ‘मन की बात’ मांडून अमेरिकन नागरिकांशी हितगुज केले. पुढे त्यांचे हितगुज म्हणजे ‘मन की बात’ ही नित्याचीच बाब झाली. रुझवेल्ट यांच्या भाषणाची लोक वाट पाहू लागले. रुझवेल्ट यांचे भाषण होताच अमेरिकन लोकांत एकदम विश्वास निर्माण झाला. या भाषणानंतर पहिल्या तीन महिन्यांत सर्वच राष्ट्रीय बँकांनी, आर्थिक संस्थांनी जोरात उलाढाल सुरू केली. नवे सकारात्मक वातावरण निर्माण झाले. मरगळ व उदासीनता झटकली गेली. रुझवेल्ट यांनी दारूबंदीचा कडक कायदा ढिला करून प्रथम बीअर तयार करण्याची परवानगी अमेरिकन काँग्रेसकडून मिळवली. लोकांना खात्री पटली की, प्रे. रुझवेल्ट यांचे सरकार हे केवळ गतिमान व पुरोगामीच नाही, तर आनंदी व आनंदवर्धक आहे. ‘जगा आणि जगू द्या’ पद्धतीचे आहे. दुःख विसरून कामास लागा, आनंदाची नवी क्षितिजे शोधा असे सांगणारे आहे. लोकांनी त्याचे प्रचंड स्वागत केले आणि आर्थिक मंदीचे रूपांतर अर्थव्यवस्था गतिमान होण्यात झाले. हे मी का सांगतोय? आपल्याला आजचे संकट दूर करण्यासाठी एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा. कोणी काही म्हणा, प. बंगालच्या निवडणुका संपल्याने निदान पंतप्रधान मोदी यांनी आता रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे! देशाला त्याचीच गरज आहे. देशाला आता विश्वास आणि सकारात्मक ऊर्जेची गरज आहे. ती लवकरात लवकर मिळो!,” अशी आशा राऊत यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid second wave economic crisis pm narendra modi sanjay raut rokhthok maharashtra bmh
First published on: 25-04-2021 at 08:06 IST