हरियाणा पोलिसांनी मंगळवारी गोरक्षक मोनू मानेसरला अटक केली. बजरंग दलाचा सदस्य असलेल्या मोनू मानेसरवर राजस्थानमधील दोन मुस्लीम तरुणांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फेब्रुवारीमध्ये मोनू मानेसरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात साध्या वेशात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मोनू मानेसरला अटक केली. याबाबतचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना अतिरिक्त पोलीस महासंचालक ममता सिंग यांनी सांगितलं की, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे मोनू मानेसरला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या अटकेबाबत इतर राज्यातील पोलीस विभागालाही माहिती दिली आहे. मोनू मानेसरला न्यायालयात हजर केल्यानंतर राज्य पोलीस पोलीस कोठडीची मागणी करू शकतात, अशी माहितीही ममता सिंग यांनी दिली.

कोण आहे मोनू मानेसर?

मोनू मानेसर उर्फ मोहित यादव हा बजरंग दलाचा सदस्य आणि गोरक्षक आहे. तो गुरुग्रामजवळील मानेसर येथील रहिवासी आहे. राजस्थानातील दोन मुस्लीम तरुणांच्या हत्येप्रकरणी तो प्रमुख आरोपी आहे.

हेही वाचा-“…तर भावी पिढ्यांना ‘धार्मिक झोंबी’ बनून बरबाद व्हावं लागेल”, बिट्टू बजरंगी अन् मोनू मानेसरचा उल्लेख करत आव्हाडांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील घाटमीका गावातील नसीर आणि जुनैद यांचं १५ फेब्रुवारी रोजी गोरक्षकांनी अपहरण केलं होतं. दुसऱ्या दिवशी हरियाणातील भिवानी येथे दोघांचे मृतदेह जळालेल्या कारमध्ये आढळले होते. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये मोनू मानेसरचं नाव आरोपी म्हणून नोंदलं होतं. तेव्हापासून मोनू मानेसर फरार होता. मंगळवारी सकाळी साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी मोनू मानेसरला अटक केली. याबाबतचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.