विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला. साखळी फेरीत अव्वल कामगिरी करणारा भारतीय संघ, उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर ढेपाळला. भारताचे दिग्गज फलंदाज मोक्याच्या क्षणी झटपट माघारी परतले. चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणं आम्हाला भोवल्याचं, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मान्य केलं आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

“होय, मधल्या फळीत आम्हाला एका अनुभवी फलंदाजाची उणीव भासली. मात्र आता या गोष्टीचा विचार भविष्यासाठी करायचा आहे. चौथ्या क्रमांकाची जागा भारतीय संघासाठी नेहमी डोकेदुखी ठरली आहे. लोकेश राहुल, विजय शंकर सारखे खेळाडू यंदाच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी होते. मात्र दुखापतीमुळे सगळं चित्र पालटलं, आणि नंतर जे काही घडलं त्यावर नियंत्रण ठेवणं आमच्या हातात नव्हतं.” रवी शास्त्रींनी भारतीय संघाच्या पराभवाचं कारण सांगितलं.

मात्र भारतीय संघाच्या कामगिरीचा आपल्याला अभिमान असल्याचंही शास्त्री यांनी आवर्जून नमूद केलं. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाने सर्वोत्तम खेळ केला आहे ही गोष्ट, एका सामन्यातल्या खराब कामगिरीमुळे नाकारता येणार नाही. विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात, अर्ध्या तासात आम्ही वाईट खेळलो, मात्र या गोष्टीचा विचार आता करण्यात काहीच अर्थ नाही. या पराभवाचं प्रत्येक खेळाडूला वाईट वाटणं साहजिक आहे, पण संघातल्या प्रत्येक खेळाडूने चांगला खेळ केला आहे. रवी शास्त्रींनी आपल्या संघाचं कौतुक केलं. दरम्यान विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – संघातल्या तरुणांना धोनीच्या मार्गदर्शनाची गरज !