पीटीआय, मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश)
खुब्बापूर (जि. मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश) गावातील शाळेत दुसरीतील अल्पसंख्य समाजाच्या एका विद्यार्थ्यांने गृहपाठ न केल्यामुळे शिक्षिकेने कथित जातीयवादी शेरेबाजी केली, तसेच त्याला थप्पड मारण्याचा आदेश वर्गातील इतर विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोप आहे. या घटनेची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्याने त्याविरुद्ध मोठे पडसाद उमटले.
मुझफ्फरनगर पोलिसांनी या शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) आवाहन केले आहे की, या मुलाची ओळख उघड होणार नाही याची दक्षता घ्यावी.
आरोपी शिक्षिकेचे नाव तृप्ती त्यागी असे आहे. मुझफ्फरनगर पोलिसांनी शनिवारी तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. परंतु अद्याप आरोप जाहीर केले नाहीत. या चित्रफितीची दखल घेऊन स्थानिक पोलीस अधिकारी रविशंकर यांनी शुक्रवारी सांगितले की, शाळेत दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे विद्यार्थ्यांला मारहाण करण्यात आल्याचे चित्रफितीच्या प्राथमिक तपासातून निदर्शनास आले आहे. त्यात आक्षेपार्ह भाषा वापरलेली नाही. मात्र, अनेक राजकीय नेत्यांकडून कठोर शब्दांत या घटनेचा निषेध करण्यात आला तसेच कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी या शिक्षिकेला तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली. या घटनेची कथित चित्रफीत समाजवादी पक्षाने ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) प्रसृत केली. अखिलेश यांनी आपल्या खात्यावरून ती पुन्हा प्रसृत केली. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टीकेचे लक्ष्य करून त्यांनी नमूद केले, की भाजप आणि संघाच्या द्वेषमूलक राजकारणामुळे देशाला हे दिवस पहावे लागत आहेत. मुझफ्फरनगरमध्ये एक शिक्षिका अल्पसंख्य समाजातील एका विद्यार्थ्यांला दुसऱ्या विद्यार्थ्यांकरवी मारहाण करत आहे. या निरागस मुलांच्या मनात जातीयतेचे विष पेरणाऱ्या या शिक्षिकेला तातडीने बडतर्फ करून कठोर शिक्षा दिली जावी.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘एक्स’द्वारे (ट्विटर) आरोप केला, की शाळेतील मुलाला झालेली कथित मारहाण हा भाजपच्या द्वेषजनक-फुटीरतावादी राजकारणाचा परिपाक आहे. असे राजकारण घटनाबाह्य आहे. अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे. असे यापुढे इतर कोणीही करू नये यासाठी दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणीही खरगे यांनी केली. खरगेंनी या संदर्भात आणखी एका घटनेचा उल्लेख केला ज्यात पालघरजवळ रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका जवानाने धर्माच्या नावाखाली चार रेल्वे प्रवाशांना गोळय़ा घालून ठार केले होते.
‘द्वेषाचा बाजार’काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या संदर्भात शुक्रवारी म्हटले होते, की, शाळेसारख्या जागेलाही ‘द्वेषाचा बाजार’ बनवला जात आहे. त्यांनी ‘एक्स’ वर नमूद केले होते, की हे ज्वालाग्राही इंधन भाजपने देशात पसरवले आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आग भडकली आहे. मुले भारताचे भविष्य आहेत – त्यांना परस्परांचा द्वेष नव्हे तर प्रेम करण्यास आपण सर्वानी शिकवले पाहिजे.