Crime News १२ वर्षांच्या मुलीवर पाच शाळकरी मुलांनी सामूहिक बलात्कार केला आहे. ही घटना शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच घडली आहे. मुरादाबाद या ठिकाणी एका शाळेत ही घटना घडली आहे. पाच शाळकरी मुलांनी १२ वर्षांच्या मुलीवर मुख्याध्यापकांच्या कार्यालयात सामूहिक बलात्कार केला आणि त्याचं चित्रणही केलं. ही घटना ८ मेच्या दिवशी घडली आहे. घडल्या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केलीस तर तुझा व्हिडीओ आम्ही व्हायरल करु अशी धमकीच या पाच जणांनी त्या मुलीला दिली होती.

पाच विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मंगळवारी संध्याकाळी या पीडित मुलीच्या आईने या मुलांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवला. पीडिता दलित आहे आणि तिच्यावर बलात्कार करणारे शाळकरी विद्यार्थीही दलित असल्याची माहिती समोर आली आहे. हे सगळेजण १२ ते १५ वयोगटातील आहेत. ही मुलगी ज्या भागात राहते त्याच ठिकाणी आसपासच्या भागात ही मुलं राहतात. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रकरण कसं उघडकीस आलं?

सामूहिक बलात्काराचं हे प्रकरण व्हिडीओमुळेच उघड झालं. तिच्या शेजाऱ्याने पीडितेच्या आईला व्हिडीओ दाखवला. त्यात तिला लक्षात आलं की ही आपलीच मुलगी आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात का आहे हे कारणही समजलं. ज्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाणं गाठलं आणि या मुलांविरोधात तक्रार दाखल केली. मुलगी गेल्या काही दिवसांपासून खूप निराश झाली होती. तिची आई तिला सातत्याने काय झालं आहे ते सांग असं विचारत होती. मात्र मुलगी व्हिडीओ व्हायरल होईल या भीतीने गप्प राहिली होती.

पीडितेने काय सांगितलं?

जेव्हा तिच्या आईने व्हिडीओ पाहिला तेव्हा पीडितेने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला. या मुलीने सांगितल्यानुसार ही मुलगी ८ मेच्या दिवशी साधारण दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान खेळत होती. त्यावेळी काही मुलं तिथे आली त्यांनी तिला ज्युनिअर कॉलेजजवळ नेलं तुला खाऊ किंवा चॉकलेट घेऊन देतो असं सांगितलं होतं. त्यावेळी एक मुलगा शाळेची आणि मुख्याध्यापकांच्या कार्यालयाची चावी बरोबर घेऊन आला होता. या मुलाचे वडील त्याच शाळेत वॉचमन म्हणून काम करतात त्यामुळे चावी कुठे ठेवतात ते त्याला माहीत होतं. या मुलीला बहाणा करुन शाळेत नेण्यात आलं. त्यानंतर शाळेच्या मुख्य दाराला कुलुप लावण्यात आलं. त्यानंतर सदर मुलीला मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्ड ड्रींकमध्ये अंमली पदार्थ मिसळून ते मुलीला प्यायला दिलं

बलात्कार करण्याआधी या मुलीला या मुलांनी कोल्ड ड्रिंक प्यायला दिलं होतं. त्यात अंमली पदार्थ मिसळण्यात आले होते. मुलीची शुद्ध हरपली तेव्हा तिच्यावर या मुलांनी बलात्कार केला आणि त्याचं चित्रणही केलं. धमकी दिल्याने ही मुलगी गप्प बसली तरीही तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. हे सगळेजण सातवी ते नववीच्या वर्गातले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड समोर या प्रकरणाची सुनावणी चालणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.