Crime News : एका २७ वर्षीय विवाहितेला तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी आधी गळा दाबून ठार केलं आणि त्यानंतर तिचा अपघाती मृत्यू झाला आहे हे दाखवण्यासाठी तिचा मृतदेह बाईकला बांधला आणि तो फरपटत नेला. कर्नाटकच्या बेळगावमध्ये ही घटना घडली आहे. विवाहितेच्या नवऱ्याने पत्नीचा मृतदेह बाईकला बांधला आणि साधारण १२० फुटांपर्यंत तिला ओढत नेलं. तिचा अपघाती मृत्यू झाला आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र ती हत्या होती. महिलेला मूल होऊ शकत नाही त्यामुळे तिला ठार करण्यात आलं आणि तिचा अपघात झाला आहे असं भासवण्यात आलं.
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलेचा मृत्यू झाला तिचं नाव रेणुका असं होतं. ती आई होऊ शकत नाही म्हणून तिला तिच्या सासरच्या मंडळींनी आणि नवऱ्याने ठार मारलं. त्यानंतर तिचा मृतदेह बाईकला बांधून फरपटत नेला आणि अपघाती मृत्यू झाल्याचं भासवलं. तिचा नवरा संतोष होनकांडे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं, जी आता गरोदर आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली.
रेणुका तिच्या माहेरी जात नव्हती त्यामुळे तिची हत्या करण्यात आली
रेणुका आई होऊ शकत नाही ही बाब तिच्या नवऱ्याला आणि तिच्या सासरच्या मंडळींना कळली होती. त्यानंतर तिला तू घर सोडून तुझ्या माहेरी जा असं तिला सांगण्यात आलं. मात्र रेणुका त्याच घरात वास्तव्य करत होती. त्यामुळे तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी तिच्या हत्येचा कट रचला. या प्रकरणात रेणुकाचा नवरा संतोष, त्याचे वडील कामण्णा आणि आई जयश्री या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुलेड यांनी काय सांगितलं?
बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुलेड यांनी ही एक भयंकर घटना असल्याचं म्हटलं आहे. आम्हाला सुरुवातीला तिच्या सासऱ्याने म्हणजेच कामण्णाने फोन केला आणि सांगितलं की रेणुकाचा अपघाती मृत्यू झाला. रेणुका तिच्या पतीसह मोटरसायकलवर बसली होती तेव्हा हा अपघात झाला असं कामण्णाने पोलिसांना सांगितलं. पोलीस घटनास्थळी पोहचले त्यावेळी पोलिसांना रेणुकाचा मृतदेह पाहून संशय आला. ज्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. कामण्णाला पोलिसांनी विविध प्रश्न विचारले ज्याची उत्तरं देताना कामण्णा गडबडला आणि नंतर घडला प्रकार समोर आला अशी माहिती गुलेड यांनी दिली.
रेणुकाची हत्या नेमकी कशी करण्यात आली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रेणुका मंदिरात गेली होती. त्यावेळी तिचा नवरा आणि तिचे सासू-सासरे तिला घ्यायला मंदिरात आले. घरीत परतत असताना काही अंतर गेल्यानंतर तिला बाईकवरुन ढकलण्यात आलं. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर तिच्या साडीच्या मदतीने तिचा मृतदेह बाईकला बांधण्यात आला आणि तिचा मृतदेह फरपटवण्यात आला. तिचा मृत्यू अपघातामुळे झाला आहे असं भासवण्यात आलं. मात्र अवघ्या सहा तासांमध्ये पोलिसांनी हा अपघात नसून हत्या आहे हे सिद्ध केलं. रेणुकाचा नवरा, सासरा आणि सासू यांची चौकशी केल्यानंतर त्यांनीही गुन्हा कबूल केला ज्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली.