Croatian PM Gift to Narendra Modi भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या क्रोएशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांना एक अमूल्य भेट देण्यात आली आहे. क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेंकोविज यांनी संस्कृत व्याकरणाचं पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलं आहे. या पुस्तकाचं नाव ‘वेजडिन यांचं संस्कृत ग्रामर’ ( Vezdin Sanskrit Grammar) हे पुस्तक भेट दिलं आहे.

मोदींना भेट देण्यात आलेल्या पुस्तकाची खासियत काय?

क्रोएशियाचे वैज्ञानिक आणि मिशनरी फिलिप वेजडिन यांनी संस्कृतबाबतचं हे पुस्तक १७९० मध्ये पहिल्यांदा लॅटिन भाषेत छापण्यात आलं होतं. फिलिप वेजडिन यांनी १७७४ मध्ये भारत दौरा केला होता. त्यानंतर ते मलबारचे व्हॉईस जनरल झाले. त्यांनी भारतात असताना हे पुस्तक लिहिलं होतं. फिलिप वेजडिन हे युरोपातले पहिले असे संशोधक होते ज्यांनी भारतीय भाषा आणि संस्कृती यांचा गांभीर्याने अभ्यास केला.

पंतप्रधान मोदींचा पहिलाच क्रोएशिया दौरा

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रोएशियाचे नेते सिनिशा ग्रगिका यांनी लिहिलेलं पुस्तकही भेट म्हणून देण्यात आलं आहे. “Croatia and India: Bilateral Navigator for Diplomats and Business” असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात भारत आणि क्रोएशिया यांच्या संबंधांचं तुलनात्मक वर्णन आणि विश्लेषण करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रोएशियाचा दौरा केला आहे. क्रोएशियाला जाणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रोएशियाची राजधानी जाग्रेब या ठिकाणी पोहचले. क्रोएशियाच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं औपचारिक पद्धतीने स्वागत केलं. तसंच मोदींच्या स्वागतासाठी क्रोएशियात असलेले भारतीय नागरिकही मोठ्या प्रमाणावर आले होते. मोदी मोदी आणि भारतमाता की जय या घोषणा यावेळी देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही क्रोएशियातल्या काही भारतीयांशी संवाद साधला तसंच त्यांच्या बरोबर वेद पठणही केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाग्रेब या ठिकाणी काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले जाग्रेबमध्ये भारतीय संस्कृतीला सन्मान मिळाला आहे. भारतीय समुदायाने क्रोएशियाच्या प्रगतीत हातभार लावला ही अभिमानास्पद बाब आहे. क्रोएशियात येऊनही आपलं भारतीय मूळ न विसरणाऱ्या या सगळ्यांना भेटून मला आनंद झाला असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच माझ्या या दौऱ्यानंतर भारत आणि क्रोएशिया यांचे संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास मला वाटतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रोएशियाच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यावर दोन्ही नेत्यांच्या प्रतिनिधी मंडळांचीही चर्चा झाली. पंतप्रधान प्लेंकोविच म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा एका खास समयी पार पडतो आहे. या ऐतिहासिक दौऱ्यामुळे भारत आणि क्रोएशिया यांच्यातले आर्थिक संबंध आणखी बळकट होतील असा विश्वास मला वाटतो.