पीटीआय, नवी दिल्ली
केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) सर्व बदल्या, नियुक्ती आदेश पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रमही पुढे ढकलण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. याशिवाय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि लष्करासह सीमावर्ती भागात सुरक्षा बळकट करण्यासाठी निमलष्करी दलाने त्यांच्या दोन डझनहून अधिक कंपन्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामध्ये सुमारे २,४०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, देशाचा पश्चिम आणि उत्तरेकडील भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी मुख्यालयातून सर्व प्रकारच्या बदल्या आणि नियुक्ती आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच अधिकारी आणि जवानांना नेमणुकीच्या ठिकाणी कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी मनुष्यबळ त्यांच्या तैनातीच्या ठिकाणी राखून ठेवावे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.