CRPF Van Accident in Udhampur of Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना घेऊन जाणारं एक वाहन खोल दरीत कोसळलं आहे. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान, स्थानिक लोक व पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १८७ व्या बटालियनची बस उधमपूर जिल्ह्यातील कदवा येथील बसंत गढाचा घाट चढत असताना २०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जवान जखमी झाले आहेत.

सर्व जखमी जवानांना एअरलिफ्ट करून उधमपूरमधील भारतीय लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

बचावकार्य चालू

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की कंदवा-बसंतगड परिसरात सीआरपीएफच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या दुर्गटनेत काही जवानांनी आपला जीव गमावला आहे. हे वृत्त ऐकून मी खूप व्यथित झालो आहे. या वाहनातून सीआरपीएफचे शूर जवान प्रवास करत होते. मी आत्ताच पोलीस उपायुक्त सलोनी राय यांच्याशी बातचीत केली आहे. सलोनी वैयक्तिकरित्या या घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि वरचेवर मला माहिती देत आहेत. पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं आहे. तसेच स्थानिक लोक स्वतःहून मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. आम्ही शक्य तितकी सर्व प्रकारची मदत पुरवत आहोत.