Cyber Attack on Major European Airport: युरोपमधील प्रमुख विमानतळांवर सायबर हल्ला झाल्यामुळे शनिवारी लंडनच्या हीथ्रो, ब्रुसेल्स आणि बर्लिनसह अनेक महत्त्वाच्या विमानतळावर चेक-इन आणि बोर्डिंग प्रणाली विस्कळीत झाली. असंख्य उड्डाणे रद्द करण्यात आली असून विमानतळावर हजारो प्रवासी खोळंबले आहेत.
यूकेमधील स्काय न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. “तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे चेक-इन आणि बोर्डिंग प्रणालीवर परिणाम झाला आहे. सायबर हल्ल्याच्या शक्यतेमुळे विमानतळावरील सेवा ठप्प झाली आहे”, अशी माहिती बेल्जियममधील ब्रुसेल्सच्या विमानतळ अधिकाऱ्यांनी स्काय न्यूजला दिली.
इतर युरोपियन विमानतळांनीही तांत्रिक समस्या उभी राहिल्याचे म्हटले आहे. ब्रुसेल्स विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, तेथील १० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच १७ विमानांना एक तास किंवा त्यापेक्षा अधिकचा उशीर होऊ शकतो. ही तांत्रिक समस्या कधी सोडवली जाईल, हे आताच सांगता येणार नसल्याचेही विमानतळ अधिकाऱ्यांनी स्काय न्यूजला सांगितले आहे.
शनिवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानतळ अधिकाऱ्यांनी प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या एअरलाइनबरोबर संपर्कात राहण्यास सांगितले आहे. जेणेकरून विमानास किती उशीर होईल, याची माहिती मिळू शकेल. अचानक उद्भवलेल्या या समस्येमुळे अनेक ठिकाणी प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विमानतळावर ठिकठिकाणी खोळंबलेल्या प्रवाशांची गर्दी झाली आहे.
बर्लिन विमानतळाने त्यांच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे या समस्येची माहिती दिली आहे. “युरोपमधील विमानतळावरील संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे चेक-इनसाठी जास्त वेळेची प्रतिक्षा करावी लागत आहे. आम्ही यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत”, असे संकेतस्थळावरील संदेशात म्हटले आहे.