अहमदाबाद : अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी गुजरात किनाऱ्यावर धडकले. कच्छच्या जखाव बंदर भागात या चक्रीवादळाचा भूस्पर्श होण्याची प्रक्रिया गुरुवारी सायंकाळी सुरू झाल्यानंतर ती मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिली. त्या भागात  ताशी सुमारे शंभर किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा तसेच त्यासोबत सुरू झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा या भागाला बसला. हे वादळ सौराष्ट्र आणि कच्छ तसेच लगतच्या मांडवी आणि कराचीदरम्यानच्या किनाऱ्यावरून जाईल, असा इशारा हवामान विभागाने आधीच दिला होता.

अरबी समुद्रात घोंघावत असलेले बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या कच्छमध्ये जखाव बंदराजवळ धडकले. हवामान खात्याने यासंबंधी माहिती देताना सांगितले की, गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत चक्रीवादळ या भागात राहील. चक्रीवादळामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने कच्छ आणि सौराष्ट्रच्या किनारपट्टीला झोडपून काढले. चक्रीवादळाचा व्यास ५० किमी इतका  आहे. हे वादळ तब्बल १० दिवस अरबी समुद्रात होते.

एनडीआरएफच्या १५ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या असून किनारपट्टीजवळील सुमारे एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्याबरोबरच राज्याचे आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दल आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.