पुद्दुचेरी : ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुद्दुचेरीमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळ स्थिर झाले असून त्याची गती हळूहळू कमी होईल, अशी माहिती विभागाने दिली. रविवारी सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. सरकारने सखल भागातून सुरक्षित बाहेर काढलेल्या नागरिकांसाठी मदत केंद्र स्थापन केले आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीनंतर विमानतळावरून संचालन सुरू करण्यात आले असले तरी रविवारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली किंवा उशिराने झाली.

हेही वाचा >>> मतदान आकडेवारी वाढविण्यासंदर्भात याचिका; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुद्दुचेरीमध्ये रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत ४६ सेमी पावसाची नोंद झाली. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे बुलीवर्ड हद्दीतील सर्व निवासी भाग पाण्याखाली गेले. चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, निवासी वसाहतींमध्ये पूर आला असून वाहने पावसाच्या पाण्यात अंशत: बुडाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे लोकांनी सांगितले. निसर्गाचा असा कहर तीन दशकांपूर्वी केंद्रशासित प्रदेशातही पाहायला मिळाला होता, असे वृद्धांचे म्हणणे आहे. पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले. अतिवृष्टीचा फटका शेतातील पिकांना बसला आहे. वाहतूक सेवा प्रभावित झाल्या होत्या. अनेक बाधित भागांत बचावकार्य सुरू असून पूरग्रस्त भागातून शेकडो लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीवा नगर आणि इतर संवेदनशील भागात लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि आवश्यक मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.