Cyclone Alert India : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले असून या चक्रीवादळाला थायलंडने सुचवलेले ‘मोंथा’ हे नाव देण्यात आले आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर असणारे हे चक्रीवादळ मोंथा गेल्या सहा तासांत ताशी १५ किलोमीटर वेगाने उत्तर-उत्तरपश्चिमेकडे सरकले आहे आणि मंगळवारी पहाटे ५.३० वाजता या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात झाले आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे
तसेच ही हवामान प्रणाली पहाटे ५.३० वाजता मछलीपट्टणमच्या १९० किमी दक्षिण ते आग्नेयेला, काकीनाडाच्या २७० किमी दक्षिण ते आग्नेयेला आणि विझागच्या ३४० किमी दक्षिण-आग्नेयेला केंद्रित होती, अशी माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ज्या भागात पाऊस आणि पुराची शक्यता आहे अशा भागात अधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि चक्रिवादळाबद्दल माहिती घेतली.
हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’
भारतीय हवामान विभागाने दक्षिण भारतातील समुद्रकिनाऱ्यांलगतच्या काही जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विभागाने १९ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. याचप्रमाणे नंद्याल, काडप्पा, अन्नामय्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, जेथे काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता. याच प्रमाणे कुर्नूल, अनंतपूर, श्री सत्य साई आणि चितूर जिल्ह्यात देखील काही भागात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
ओडिशामध्ये पावसाचा कहर
ओडिशाच्या आठ जिल्ह्यांमध्येही मोंथा चक्रवादळामुळे जोरदार पाऊस कोसळत आहेत. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, ओडिशा सरकारने मालकानगिरी, कोरापुट, रायगड, गजपती, गंजम, नबरंगपूर, कालाहांडी आणि कंधमाल या आठ जिल्ह्यांमधील सखल भागातून तसेच भूस्खलनाची शक्यता असलेल्या डोंगराळ प्रदेशातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसेच, बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, ओडीआरएएफ आणि अग्निशमन दलाच्या १४० बचाव पथके (५००० हून अधिक कर्मचारी) तैनात करण्यात आले आहेत.
चक्रीवादळ मोंथाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, छत्तीसगड आणि पुद्दुचेरी या फटका बसण्याची शक्यता असलेल्या राज्यांमधील किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये २५ पथके आधीच तैनात केल्या आहेत. आवश्यकता पडल्यास आणखी २० पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच प्रवाशांची सुरक्षिततेसाठी, दक्षिण मध्य रेल्वेने सोमवारी एक बुलेटिन जारी केले आहे, ज्यामध्ये अनेक रेल्वे सेवा अंशतः रद्द करणे, त्यांचे वेळापत्रक बदलणे आणि काही सेवा पूर्ववत करण्याची घोषणा करण्यात आली हे. प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या रेल्वे गाडीचे स्टेटस तपासून बघण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
चक्रीवादळ जमिनीवर कधी थडकणार?
चक्रीवादळ मोंथा मंगळवारी संध्याकाळी आंध्र प्रदेशातील काकीनाडा जवळ धडकण्याची शक्यता असल्याने, राज्यातील अनेक किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण ओडिशातील काही भागांमध्ये आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात समुद्र खवळल्याचे पाहायला मिळाले, तेथे वारे आणि पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. याबरोबरच आंध्र प्रदेशच्या विजयवाजा येथे देखील चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळाला. आज सकाळी तमिळनाडूमधील चेन्नई शहरात देखील जोरदार पाऊस झाला.
महाराष्ट्रातही पावसाची शक्यता
मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील काही तासात पुण्यासह राज्यभरात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. पुणे, मुंबई, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ वायव्येकडे सरकून मंगळवारी (२८ ऑक्टोबर) आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांना रेड अलर्ट, तर पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मोंथाचा अर्थ काय?
उत्तर हिंद महासागर प्रदेशातील चक्रीवादळांना नाव देण्याचे काम भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अखत्यारितील प्रादेशिक विशेष हवामान केंद्राद्वारे केले जाते. हे केंद्र जागतिक हवामान संघटना, आशिया आणि पॅसिफिकसाठी संयुक्त राष्ट्रांचा आर्थिक आणि सामाजिक आयोग यांच्या देखरेखीखाली कार्य करते. या प्रदेशातील चक्रीवादळांसाठी नावे सुचवणाऱ्या देशांमध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, येमेन, इराण, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे.
प्रत्येक देशाकडून १३ नावे सुचवण्यात येतात. त्यानुसार तयार होणाऱ्या १६९ नावांची यादी तयार होते. नवीन चक्रीवादळ तयार झाल्यावर हवामान विभागाकडून या यादीतील पुढील नाव त्या चक्रीवादळाला देण्यात येते.बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला मोंथा हे थायलंडने सुचवलेले नाव देण्यात आले आहे. सुवासिक फुल किंवा सुंदर फुल असा मोंथा या शब्दाचा थाई भाषेतील अर्थ आहे.
