ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर येत्या रविवापर्यंत चक्रीवादळ येऊन थडकणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने दोन्ही राज्य सरकारने सर्व खात्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे. ओदिशा सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना पूजेसाठी दिलेल्या सुट्टय़ा रद्द केल्या असून, संवेदनक्षम ठिकाणी आपत्कालीन शीघ्र दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. तर आंध्र प्रदेश सरकारने तटवर्ती क्षेत्र आणि रायलसीमातील संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.
दोन्ही राज्यांनी अन्य सरकारी विभागांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या असून, त्यापूर्वीच  आपत्कालीन शीघ्र दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत, असे ओदिशाचे महसूल आणि आपत्कालीन व्यवस्थापनमंत्री एस. एन. पात्रो यांनी सांगितले. मात्र आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा निर्णय रद्द करण्याचे आश्वासन केंद्र सरकारकडून मिळेपर्यंत संप मागे न घेण्यावर कर्मचारी ठाम आहेत. आंध्र प्रदेश सरकारने हेलिकॉप्टर, बोटी संवेदनक्षम ठिकाणी तैनात ठेवण्याचे आदेश दिले असून नौदलाची सेवाही सज्ज ठेवली आहे. चक्रीवादळामुळे विजेच्या पुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वीज कर्मचाऱ्यांनाही दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ घोंघावत असून ओदिशा-आंध्र प्रदेश तटवर्ती क्षेत्रातून जाताना त्याची विनाशकारी शक्ती आणि वेग असेल, असे हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे. वाऱ्याचा वेग ताशी १७५ ते १८५ कि.मी. इतका असण्याची शक्यता आहे.