यंदाच्या मान्सूनवर एल निनो घटकाची छाया असतानाच वायू वादळामुळे अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. स्कायमेटने जून महिन्यात कमी पाऊस होईल याचे भाकीत आधीच वर्तवले होते. आता वायू वादळामुळे मान्सूनचे वेळापत्रक कोलमडले आहे. मान्सूनच्या चांगल्या सुरुवातीसाठी आधीच हवामान अनुकूल नव्हते आता वायूमुळे मान्सून आणखी लांबत चालला आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी मान्सून अजूनही वेगाने पुढे सरकत नाहीय. त्यामुळे दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे. वायूने फक्त मान्सूनला विलंबच केलेला नाही तर ठप्प केले आहे. केरळला आठ जूनला दाखल झाल्यानंतर मान्सूनचा मंदगतीने प्रवास सुरु आहे. ईशान्य भारतातील राज्ये आणि कर्नाटकाच्या किनारपट्टीपर्यंतच्याच भागात मान्सून सक्रीय झाला आहे.
दरवर्षी मान्सून या काळात मुंबई, कोलकाता या शहरांसह देशाचा दोन तृतीयांश भाग व्यापून टाकतो. यंदा मान्सूनने फक्त एक तृतीयांश भागच व्यापला आहे. याला वायू जबाबदार आहे असे स्कायमेटने म्हटले आहे.