संकटात असलेल्या दाभोळ कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यासाठी शक्य असलेले सर्व पर्याय तपासण्यात येत आहेत, असे राष्र्ट्ीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या वतीने (एनटीपीसी) शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.
दाभोळ प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले जाईल, एखादा प्रकल्प स्वत:हूनच मृतप्राय व्हावा हे आपल्यासारख्या देशाला कसे परवडेल, त्यामुळेच अनेक पर्यायांचा विचार केला जात असून प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले जाईल, असे एनटीपीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरूप रॉय चौधरी यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. सध्या दाभोळ प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जात नाही.
दाभोळ अथवा रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रा. लि.(आरजीपीपीएल) या कंपनीचे प्रत्येकी ३२.९ टक्के समभाग गेल आणि एनटीपीसीकडे आहेत तर महाराष्ट्र सरकारकडे १७.४ टक्के समभाग आहेत तर आयडीबीआय, भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय आणि कॅनरा बँक यांच्याकडे १६.८ टक्के समभाग आहेत.