बौद्ध धर्माचे नेते दलाई लामा यांनी मंगोलियन मुलाला तिब्बतच्या बौद्ध धर्मातील महत्त्वाचा तिसरा आध्यात्मिक नेता म्हणून घोषित केले आहे. ८ मार्च रोजी हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येते पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी घोषणा केली. यासंदर्भातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून या फोटोंमध्ये दलाई लामा यांच्याकडून एक मुलगा लाल वस्त्र परिधान करताना दिसून येत आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला मुलाच्या वडिलांसह ६०० मंगोलियन नागरिक उपस्थित असल्याची माहिती आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या मुलाचं वय आठ वर्ष असून अगुइदई आणि अचिल्टाई नावाच्या जुळ्या मुलांपैकी हा एक असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच या मुलाचे वडील प्राध्यापक असून त्याच्याकडे अमेरिका आणि मंगलोलिया या दोन देशाचं नागरिकत्व असल्याचीही माहिती. तसेच दलाई लामा यांनी या मुलाला १० वे खलखा जेटसन धम्पा रिनपोछे यांचा पुनर्जन्म असल्याचे म्हटलं आहे.
हेही वाचा – खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना आणखी एक धक्का, लोकसभा हाऊस कमिटीने बजावली ‘ही’ नोटीस
दलाई लामा यांनी २०१६ साली मंगोलियाला भेट दिली होती. त्यांच्या या भेटीवर चीनने नाराजी व्यक्त केली होती. तसेच चीन-मंगोलियन संबंधांवर याचा नकारात्मक परिणाम होईल असंही चीनने म्हटलं होतं. महत्त्वाचं म्हणजे यादरम्यान दलाई लामा यांनी बौद्ध धर्मातील तिसरे सर्वात महत्त्वाचे लामा यांचा पुनर्जन्म मंगोलियात झाला असल्याचं म्हटलं होते. त्यानंतर काही वर्षांपासून त्या मुलाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, दलाई लामा यांनी मंगोलियन मुलाला धर्मगुरू म्हणून घोषित केल्याने मंगोलियाच्या शेजारी असलेला चीन आणखी भडकण्याची शक्यता आहे.