हजारो निदर्शकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे तणाव

पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मृतदेहासह गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या (जीजेएम) हजारो निदर्शकांनी रविवारी सेंट्रल चौक बाजार भागात एकत्र येऊन स्वतंत्र गोरखालँड राज्याच्या मागणीसाठी घोषणा दिल्यामुळे दार्जिलिंगमधील परिस्थिती तणावपूर्ण होती.

गोरखा जनमुक्ती मोर्चा आणि पोलीस यांच्यात शनिवारी मोठय़ा प्रमाणावर चकमकी झाल्याने रविवारी दार्जिलिंगमध्ये मोठय़ा प्रमाणावर सुरक्षा दलांचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. काळे झेंडे आणि राष्ट्रध्वज हातात घेतलेले निदर्शक चौक बाजारात गोळा झाले. दार्जिलिंगमधून पोलीस व सुरक्षा दले ताबडतोब हटवण्यात यावीत अशा आशयाच्या घोषणा त्यांनी दिल्या.

चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी दार्जिलिंगमधून पोलीस व सुरक्षा दले तत्काळ हटवण्यात यावीत असे आमचे मत आहे. सरकारने आम्हाला शांततेच्या व लोकशाही मार्गाने आंदोलन करू द्यावे, असे दार्जिलिंगचे आमदार अमर राय पत्रकारांना म्हणाले.

सिंगमारी येथे पोलिसांनी शनिवारी आपल्या दोन समर्थकांना गोळ्या घालून ठार मारल्याचा दावा जीजेएमने केला. पोलिसांनी गोळीबार केल्याचे नाकारले असून एक इसम चकमकींमध्ये जखमी झाल्याचे म्हटले आहे.

काही वर्षांच्या कालावधीनंतर ८ जूनपासून दार्जिलिंगमध्ये सुरू झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये झालेला हा पहिला मृत्यू होता. दार्जिलिंगमधील ताजे आंदोलन हे ईशान्येतील तसेच विदेशातील काही बंडखोर गटांच्या पाठिंब्याने होणारे कारस्थान असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल म्हटले होते.

हिंसाचार त्यागण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी दिल्ली : स्वतंत्र गोरखालँडच्या मागणीसाठी आंदोलन करीत असलेल्या निदर्शकांनी हिंसाचाराचा मार्ग न चोखाळता, त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संवाद साधावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. हिंसाचारामुळे कुठल्याही प्रश्नावर तोडगा निघू शकणार नाही असे सांगून, दार्जिलिंगमधील लोकांनी शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रश्नाशी संबंधित सर्व लोक आणि राजकीय पक्ष यांनी त्यांचे मतभेद व गैरसमज संवादाच्या माध्यमातून शांततामय वातावरणात सोडवावेत. भारतासारख्या लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही, असेही राजनाथ म्हणाले.