प्रत्यक्ष युद्ध जिंकण्याची क्षमता आणि आत्मविश्वास पाकिस्तानने केव्हाच गमावला आहे म्हणूनच छुपी युद्धे खेळण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे मोदींचे वक्तव्य पाकिस्तानने बुधवारी फेटाळून लावले. मोदींचे आरोप निराधार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
भारताने केलेले आरोप पूर्णपणे निराधार असून या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. उलट भारताशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत अशी इच्छा पाकिस्तानची आहे. त्यामुळे आरोप करण्यापेक्षा दोन्ही देशांनी चर्चेद्वारे समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते तस्नीम असलम यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भारतभेट द्विपक्षीय संबंधांना बळकटी आणण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण ठरली होती. पाकिस्तान सातत्याने दहशतवादाचा निषेधच करत आला आहे असेही तस्नीम असलम म्हणाले.
पाकिस्तानने समोरासमोर युद्ध करण्याची ताकद गमावली असल्यामुळे छुपी युद्धे खेळण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचे म्हणत मोदींनी पाकिस्तानवर थेट शरसंधान केले होते. छुपे युद्ध ही पाकिस्तानची नेहमीचीच खेळी झाली आहे आणि हे डावपेच फक्त भारतातच नव्हेत तर जगभरात वापरले जात आहेत. त्यामुळेच त्याविरुद्ध लढण्यासाठी केवळ आपापल्या देशांच्या सैन्याचे सक्षमीकरण करीत बसण्यापेक्षा जगभरातील देशांनी समान ध्येयाने एकत्र यावे, असेही मोदी म्हणाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Day after modis proxy war charge pakistan calls it a baseless rhetoric says lets focus on resolving issues
First published on: 13-08-2014 at 02:41 IST