चेन्नई : मदुराई वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना संस्कृतमध्ये चरक शपथ देण्यात आल्यामुळे वाद उद्भवल्यानंतर या महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना रविवारी पदावरून हटवण्यात आले.राज्याचे अर्थमंत्री पलानीवेल त्यागराजन आणि वाणिज्य कर मंत्री पी. मूर्ती यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे इंग्रजीमध्ये हिप्पोक्रॅटिक शपथेऐवजी संस्कृतमध्ये शपथ देण्यात आल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.

कार्यक्रमात विद्यार्थी संस्कृतमध्ये शपथ घेत असल्याची दृश्ये सर्वत्र फिरल्यानंतर, महाविद्यालयाचे अधिष्ठाता ए. रत्नावेल यांना हटवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला. त्यांना यापुढील नियुक्तीचा आदेश न देता प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले असल्याचे त्यांना बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे.

या वादाला आणि आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध सरकारच्या कारवाईला कारणीभूत ठरलेली कारणे राजकीय स्वरूपाची असल्याचे सूत्रांनी सांगितले. इंग्रजीतील हिप्पोक्रॅटिक शपथेऐवजी संस्कृतमधील शपथ म्हणजे शतकभर सुरू असलेल्या परंपरेपासून फारकत असे मानले जात असले, तरी तमिळनाडूत हिंदूी व संस्कृत लादण्याच्या कथित प्रयत्नांवरून राज्य व केंद्र यांच्यातील संघर्षांमुळेही हा वाद भडकला. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांनी पारंपरिक हिप्पोक्रॅटिक शपथेऐवजी चरक शपथ लागू करण्याची शिफारस वैद्यकीय शिक्षणाचे नियंत्रक असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केल्यानंतरही हा वाद सुरू करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 ‘चरक शपथ’ ही ऐच्छिक असेल आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांवर ती लादली जाणार नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी अलीकडेच म्हटले असले, तरी चरक शपथेचे एक सुधारित प्रारूप नव्या तुकडय़ांच्या शपथग्रहण समारंभासाठी महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात आले.