दिल्लीत उपासमारीमुळे तीन चिमुरडय़ा मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक तितकीच हृदयद्रावक घटना घडली आहे. सदर मुलींच्या आईने तीन मुलींना रुग्णालयात आणले तेव्हा डॉक्टरांनी त्या मुलींना मृत घोषित केले. या मुलींचा मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.पोलिसांनी या मुलींच्या आईला मृत्यू कशामुळे झाला असे विचारले असता त्यांनी आपल्याला अन्न द्या, असे सांगितले आणि त्या खाली कोसळल्या. मृत पावलेल्या मुली दोन, चार आणि आठ वर्षांच्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी काहीच खाल्ले नव्हते, सोमवारी रात्री त्यांची प्रकृती प्रचंड खालावली, जेव्हा त्यांना आणण्यात आले तेव्हा जे समोर आले ते पाहून धक्का बसला, आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आपण असे कधीही पाहिले नव्हते, असे डॉक्टर म्हणाले.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब पश्चिम बंगालमधील आहे. मुलींचा मृत्यू झाल्यापासून त्यांचे वडील बेपत्ता आहेत. त्यांची रिक्षा चोरीला गेल्यापासून ते काम शोधत आहेत. तर मुलींच्या आईची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे दिसत आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दोन बहिणी अनेक दिवसांपासून आजारी होत्या, मात्र सर्वात मोठय़ा मुलीला शाळेत माध्यान्ह भोजन मिळत असतानाही ती आजारी कशी पडली असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंब वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी काही औषधे मिळाली असून त्यांची तपासणी केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death due to hunger
First published on: 27-07-2018 at 01:03 IST