मंगळूरु : कडव्या हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ३ जानेवारी रोजी एका मुस्लिम व्यक्तीवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात या व्यक्तीचा रविवारी खासगी रुग्णलयात मृत्यू झाला. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृताच्या कुटुंबियांना १० लाखांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.


अहमद बशीर (वय ४७) असे हिंदूत्ववाद्यांच्या हल्लात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ३ जानेवारी रोजी रात्री भाजप कार्यकर्ते दीपक राव यांची कटिपल्ला भागात चार मुस्लिम तरुणांकडून अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बशीरवर झालेला हल्ला हा बदला घेण्याच्या हेतूनेच झाला असल्याचे पोलिसांनी आपल्या चौकशी अहवालात म्हटले आहे. दरम्यान, बशीरच्या हल्लेखोरांना पोलिसांनी शनिवारी अटक केली.

रुग्णालय आणि पोलिसांनी जखमी बशीरचा मृत्यू झाल्याचे शनिवारी अधिकृतरित्या जाहीर केले. ही घटना घडलेल्या ठिकाणच्या शेजारच्या उडीपी गावात मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, तत्पूर्वीच त्यांनी मृत बशीरच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे.