बदनामीच्या खटल्यातून वगळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केलेल्या अर्जांचा विचार करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्लीतील न्यायालयाला दिले. केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचा मुलगा अमित यांनी केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला आहे.
बदनामीच्या खटल्यातून वगळण्यासाठी केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी केलेल्या अर्जावर विचार करावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीतील स्थानिक न्यायालयाला दिले होते. त्याविरुद्ध अमित सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्त्वाखाली पीठाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांना बदनामीच्या खटल्यातून वगळण्यावर कोणताही विचार नये, असे स्पष्ट केले.
कपिल सिब्बल दूरसंचार मंत्री असल्यामुळे त्यांच्या पदाचा मुलगा अमित यांनी गैरफायदा घेतल्याचा आरोप केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी केला होता. त्याविरोधात अमित यांनी या दोघांविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे.