US Attacks on Iran Defence Expert Praful Bakshi Explains : इस्रायल व अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या अणू प्रकल्पांवर हल्ले करुन इराणचं मोठं नुकसान केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांची समाजमाध्यमांवरून माहिती दिली आहे. “अमेरिकन वायूदेलाने इराणमधील फोर्डो, नतान्झ व इस्फहानमधील तीन अणू प्रकल्पांना लक्ष्य केलं. हे हल्ले अचूक लक्ष्यभेद करणारे होते. यशस्वी हल्ले करून अमेरिकेची सर्व लढाऊ विमानं आता आता सुरक्षितपणे इराणच्या हवाई हद्दीबाहेर पडली आहेत”, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
या हल्ल्याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असताना अनेक संरक्षण तज्ज्ञ या हल्ल्याचं व त्याच्या जगावर होणाऱ्या परिणामांबाबत विश्लेषण करत आहेत. दरम्यान, संरक्षण तज्ज्ञ प्रफुल्ल बक्षी म्हणाले, “इराणला आता समजलंय की अमेरिका या युद्धाबाबत खूप गंभीर आहे. अमेरिका आता शिकार करण्यासाठी बाहेर पडली असून शिकार देखील निवडण्यात आली आहे. अमेरिकेने हल्ले देखील सुरू केले आहेत. अमेरिकन लष्कर आता शिकार केल्याशिवाय माघारी परतणार नाही. शिकारी ट्रम्प यांनी त्यांचं काम सुरू केलं आहे”.
प्रफुल्ल बक्षी काय म्हणाले?
बक्षी म्हणाले, “अमेरिका शिकार कशी करते ते आपण याआधी इराकच्या दोन्ही युद्धांच्या वेळी पाहिलं आहे. आता हे युद्ध (इस्रायल-इराण) कधी व कुठे थांबतंय ते पाहावं लागेल. या युद्धात आतापर्यंत इराणचं बरंच नुकसान झालं आहे, अमेरिकेनेही हल्ले केले आहेत, यातून इराणला डोकं वर काढायला बराच वेळ लागेल”.
“चीन व रशियासाठी हा मोठा इशारा”
प्रफुल्ल बक्षी म्हणाले, “अमेरिका व इस्रायलने इराणी लष्कराला निष्प्रभ करून टाकलंय. तसेच इराणला थेट संदेश दिला आहे की आता तरी जागेवर या. ट्रम्प यांनी सांगितलंय की मी आता लष्करी कारवाई करणार नाही. मात्र तुम्ही ऐकलं नाही तर मी थांबणार नाही. इराणसाठी हा खूप मोठा इशारा आहे. तसेच इराण समर्थक राष्ट्रांना देखील ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. प्रामुख्याने चीन व रशियासाठी हा मोठा इशारा आहे. कारण ही दोन्ही राष्ट्रे इराणचं समर्थन करतात. तर, इस्रायलला समजलंय की अमेरिका पूर्णपणे आपल्याबरोबर आहे”.