भूज : संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या अशा सर क्रीक भागामध्ये पाकिस्तानने कोणतेही दुःसाहस केल्यास त्यांना चोख उत्तर देऊ, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला. संरक्षणमंत्र्यांनी भूज येथील लष्करी तळावर सैनिकांबरोबर विजयादशमी साजरी केली आणि शस्त्रपूजा केली. त्यावेळी ते बोलत होते.
पाकिस्तान सीमेजवळ लष्करी बांधकामाचा विस्तार करत आहे, त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांना पाकिस्तानला सुनावले की, त्यांनी भारताविरोधात कोणतीही कारवाई केल्यास त्यांचा इतिहास आणि भूगोल बदलणारे निर्णयात्मक उत्तर देऊ. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान लष्कराने आपली उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य केली, पाकिस्तानबरोबर युद्ध वाढवणे हा आपला हेतू नव्हताच, असेही सिंह यांनी स्पष्ट केले. या मोहिमेमुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षणाच्या मर्यादा उघड केल्या आणि भारताची निर्णयात्मक क्षमता सिद्ध केली, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
पाकिस्तानने सर क्रीक भागात भारताविरोधात कोणतीही कारवाई करू नये असा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिला. सर क्रीक ही कच्छचे रण आणि पाकिस्तानदरम्यानची ९६ किलोमीटर लांबीची खाडी आहे. या खाडीच्या सीमेवरून दोन्ही देशांमध्ये वाद आहे. स्वातंत्र्याला ७८ वर्षे झाल्यानंतरही पाकिस्तान सर क्रीकच्या मुद्द्यावरून वाद निर्माण करत असल्याची टीका राजनाथ सिंह यांनी केली. हा वाद सोडवण्यासाठी भारताने वारंवार प्रयत्न केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
१९६५मध्ये लष्कराने लाहोरपर्यंत पोहोचून धाडस दाखवले होते. २०२५मध्ये पाकिस्तानने लक्षात ठेवावे की, कराचीला जाणारा मार्ग याच खाडीतून जातो. – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
लडाख लक्ष्य ऑपरेशन
सिंदूरदरम्यान पाकिस्तानने भारतीय सैन्याची संरक्षणाची भिंत भेदून सर क्रीक सेक्टरमधून लडाखपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली. त्यांनी सांगितले की, भारतीय सैन्याने त्यांना चपळाईने आणि परिणामकारक उत्तर दिले. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेचा कमकुवतपणा उघड झालाच, त्याशिवाय आम्ही ठरवलेल्या वेळी, ठिकाणी आणि पद्धतीने शत्रूचे मोठे नुकसान करू शकतो हा संदेशही आम्ही जगाला दिला.