लष्कराकडे पुरेशा प्रमाणात दारूगोळा असल्याचा खुलासा संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी राज्यसभेत केला आहे. विरोधी सदस्यांनी केंद्रीय लेखा महापरीक्षकांच्या (कॅग) अहवालाचा हवाला देत देशातील अपुऱ्या दारूगोळावर चिंता व्यक्त केली होती. कॅगने आपल्या अहवालात देशातील सैन्यदलाकडे अवघ्या १० दिवसांपर्यंतचा दारूगोळा असल्याचे म्हटले होते. विशेषत: रणगाडे आणि तोफांची कमतरता असून १५२ प्रकारच्या हत्यारांपैकी १२१ हत्यारे ही युद्धासाठीच्या किमान मानकासही अनुरूप नसल्याचे म्हटले होते. कॅगच्या या अहवालानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. सीमेवर तणाव असताना हा अहवाल बाहेर आल्याने केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभेतील शून्यकालादरम्यान समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. सीमेवर पाकिस्तान आणि चीनकडून दबाव वाढता दिसत आहे. त्याचवेळी दारूगोळ्याची कमतरता चिंतेचा विषय असल्याचे ते म्हणाले. देशाकडे १० दिवसांपेक्षा अधिक दारूगोळा नाही, असे ते म्हणाले. तर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी मागील तीन वर्षांत केंद्र सरकारने काहीच केले नसल्याचे म्हटले. तसेच माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर टीका करत ते अकार्यक्षम होते असा आरोप केला.

यावर जेटली म्हणाले, एक विशेष अहवाल २०१३ मध्ये देण्यात आला होता. त्याच्यावर आधारित एक नवा अहवाल नुकताच जमा करण्यात आला आहे. हा अहवाल लोकलेखा समितीसमोर ठेवला जाण्याची शक्यता आहे. आपण कॅगच्या अहवालावर चर्चा करत नाही. पण या अहवालाकडे लक्ष असते.

हा एका कालावधीतील अहवाल आहे. त्यानंतर या परिस्थितीत नक्कीच सुधारणा झाली आहे. प्रक्रिया सुलभ झाली आहे. अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून सशस्त्र दलांना सुसज्ज करण्यात आले आहे. सरकारने नुकताच लष्कराच्या उपप्रमुखांना थेट छोटी लढाई आणि युद्धासाठी ४६ प्रकारच्या युद्ध उपकरणे खरेदी करण्याचे अधिकार दिले आहेत.

कॅगच्या अहवालात दारूगोळा साठा करण्यासाठी २०१३ नंतर योग्य पाऊल उचलले नसल्याकडे लक्ष वेधले होते. वर्ष २०१९ साठी निश्चित केल्यानुसार लष्कराकडे ४० दिवसांच्या युद्धासाठी योग्य दारूगोळा जवळ असणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defense minister arun jaitley clears that there is no threat for india says we have sufficient ammunition
First published on: 26-07-2017 at 09:19 IST