पीटीआय, लंडन

ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी ब्रिटनचे संरक्षणमंत्री ग्रँट शॅप्स यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी दोन्ही मंत्र्यांत भारत-ब्रिटनदरम्यान संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, संरक्षण उत्पादन उद्योग क्षेत्रांतील सहकार्यासंदर्भात यशस्वी वाटाघाटी झाल्या.

भारतीय संरक्षणमंत्र्यांनी २२ वर्षांच्या खंडानंतर ब्रिटनचा दौरा केला आहे. या भेटीसंदर्भात राजनाथ यांनी ‘एक्स’वर नमूद केले, की ब्रिटनचे संरक्षण मंत्री ग्रँट शॅप्स यांच्याशी एक फलदायी चर्चा झाली. आम्ही भारत-ब्रिटनदरम्यान संरक्षण संबंधांच्या साकल्याने आढावा घेतला. सुरक्षा-संरक्षण सहकार्य आणि संरक्षण उत्पादनांसंदर्भात औद्याोगिक सहकार्य वाढविण्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. याआधी राजनाथ सिंह यांनी ब्रिटिश ‘एमओडी बिल्डिंग’ येथे पोहोचल्यावर ब्रिटिश सैनिकांची मानवंदना स्वीकारली. तत्पूर्वी मंगळवारी राजनाथ यांनी यांनी मध्य लंडनमधील ‘टॅविस्टॉक स्क्वेअर’ येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून आपल्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात केली. भारतीय उच्चायुक्त विक्रम दोरायस्वामी आणि त्यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांसह राजनाथ यांनी येथील विसाव्या शतकातील महात्मा गांधी स्मारकास पुष्पहार अर्पण केला.

हेही वाचा >>>शिवसेनेला झुकते माप? महाविकास आघाडीत बहुतांश जागांवर सहमती, अंतिम निर्णय दिल्लीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर राजनाथ सिंह भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी उत्तर लंडनमधील आंबेडकर संग्रहालयाला भेट देणार आहेत. तसेच लंडनमधील स्वामीनारायण मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थनाही करणार आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ), सेवा मुख्यालय, संरक्षण विभाग आणि संरक्षण उत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या संरक्षण मंत्रालयाच्या शिष्टमंडळासह राजनाथ सिंह यांचे सोमवारी रात्री तीन दिवसांच्या दौऱ्यावर येथे आगमन झाले. ते ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतील आणि परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरून यांची भेट घेणार आहेत. राजनाथ सिंह बुधवारी एका गोलमेज कार्यक्रमात संरक्षण उद्याोगातील प्रमुखांशी संवाद साधतील आणि नंतर लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींना भेटतील. संरक्षण विश्लेषकाचा असा विश्वास आहे की या मंत्रिस्तरीय संवादाद्वारे ब्रिटिश सरकार ब्रिटीश कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.