पीटीआय, नवी दिल्ली
‘गगनयान’ मोहीम ही आत्मनिर्भर भारताच्या प्रवासामध्ये नवा अध्याय आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केले. अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि निवड करण्यात आलेले इतर तीन ‘गगनयात्री’ ही देशाची रत्ने आणि राष्ट्रीय इच्छाशक्ती जागविणारे आहेत, असेही ते म्हणाले.
ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची ‘गगनयात्री’ म्हणून निवड झाली आहे. या चार गगनयात्रींचा सत्कार सिंह यांच्या हस्ते झाला. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग या वेळी उपस्थित होते. अंतराळवीर शुक्ला आणि इतर तीन गगनयात्री कुटुंबीयांसह उपस्थित होते.
राजनाथसिंह म्हणाले, ‘‘अवकाश हे केवळ संशोधनाचे क्षेत्र म्हणून आम्ही पाहत नाही, तर अर्थशास्त्र, सुरक्षा, ऊर्जा आणि मानवता यांचे भविष्य म्हणून पाहतो. भारत पृथ्वीच्या कक्षेबाहेरही प्रगती करीत असून, अवकाशामध्ये नव्या सीमा प्रस्थापित करीत आहे. आपण चंद्रापासून मंगळापर्यंत आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. आज ‘गगनयान’सारख्या मोहिमेसाठी भारत पूर्ण सज्ज आहे. या उपलब्धी केवळ तांत्रिक प्रगती दर्शविणाऱ्या नसून, आत्मनिर्भर भारताच्या प्रवासामधील नवा अध्याय आहे.’
अंतराळवीर शुक्ला यांनी या वेळी अवकाशातून रात्रीच्या वेळी काढलेला व्हिडिओ सर्वांना दाखविला. या व्हिडिओमध्ये भारतही दिसत होता. जगातील सर्वांत सुंदर असे हे दृश्य आहे, असे शुक्ला म्हणाले. ‘ॲक्सिऑम-४ मोहीम ही देशासाठी मोठी उपलब्धी असून, अतिशय योग्य वेळी ती यशस्वी पार पडली आहे. भारत मानवी अवकाशमोहिमेची तयारी करीत आहे. भारतीय अंतराळ स्थानकासह चंद्रावर उतरण्याचीही तयारी करीत आहे. या मोहिमेतून आपण जे काही शिकलो, ते भविष्यातील देशाच्या मोहिमांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे,’ असे शुक्ला म्हणाले.
मी फार न बोलणारा आणि बुजऱ्या स्वभावाचा होतो. आम्ही लहानपणी अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या कथा ऐकायचो. हवाई दल आणि कॉकपीट (वैमानिक बसण्याची जागा) हे माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे शिक्षक आहेत. – शुभांशू शुक्ला, अंतराळवीर