दिल्लीत वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्लीतील सरकारी आणि खासगी कार्यालयांना त्यांच्या वाहनांचा वापर किमान ३० टक्क्यांनी कमी करण्याचा सल्ला दिला आहे. शहरातील नागरिकांना घराबाहेर कमी प्रमाणात पडण्यास आणि शहरातील हवेशी संपर्क कमी करण्यास सांगितले आहे. दिल्लीने या हंगामात २४ तासांमध्ये सरासरी ४७१ सह सर्वात वाईट वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) पातळी नोंदवली आहे. तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित एजन्सींना दिल्लीच्या ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनच्या (GRAP) इमरजेन्सी श्रेणी अंतर्गत दिल्ली आणि आसपासच्या परिसरात प्रदूषण विरोधी उपाययोजना अंमलात आणण्यासाठी पूर्णपणे तयार राहण्यास सांगितले आहे.

दिवाळीपासून दिल्लीतील हवा आणि पाण्यातील प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. आजही दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात हवेचा दर्जा निर्देशांक ५०० च्या पुढे धोकादायक पातळीवर आहे. वाढत्या प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि दिल्ली सरकारकडून सातत्याने काही पावले उचलली जात आहेत. मात्र आतापर्यंत हे प्रयत्न अपुरे ठरले आहेत. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आकाशात सतत धुक्याची चादर दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरून ताशेरे ओढले आहे. दिल्ली-एनसीआर प्रदूषणावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. शुक्रवारी न्यायालयाने दिल्ली सरकारला वाढत्या प्रदूषणाबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. ज्यामध्ये दिल्ली सरकारने प्रदूषण नियंत्रणासाठी उचललेल्या पावलांची माहिती देण्यास सांगितले आहे. यासोबतच दिल्ली सरकारने या प्रतिज्ञापत्राची प्रत केंद्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या शेजारील राज्यांनाही द्यावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.