दिल्लीमध्ये २०१२ साली घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एकाने सर्वोच्च न्यायालयाकडे फाशीची शिक्षा रद्द करण्यासासंदर्भात अर्ज केला आहे. विशेष म्हणजे या अर्जामध्ये दिल्लीमध्ये आधीच प्रदुषित हवा आणि पाण्यामुळे आयुष्यमान कमी झालेले असताना आम्हाला फाशी देऊन नये असा अजब युक्तीवाद निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीने आपल्या अर्जामध्ये केला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे अक्षय सिंग ठाकूर या आरोपीने केलेल्या अर्जामध्ये दिल्लीच्या प्रदुषणाचा दाखला दिला आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणी विनय शर्मा, पवन गुप्ता, अक्षय ठाकूर आणि मुकेश सिंग हे मागील सात वर्षांपासून तुरुंगामध्ये आहेत. यापैकी अक्षय ठाकूर या एकमेव आरोपीने अद्याप कोणतीही फेरविचार याचिका दाखल केली नव्हती. नुकतीच अक्षयने पाहिली याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये त्याने आपल्याला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले असून अनेक देशांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे.

आपली फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी असा दावा करताना अक्षयने एका ठिकाणी चक्क दिल्लीतील प्रदुषणाचा उल्लेख केला आहे. “…इथे मला एक गोष्ट नमूद करावी वाटते की दिल्ली एनसीआर परिसरामधील वायू प्रदुषण इतकं वाढलं आहे की शहर एखाद्या गॅस चेंबरप्रमाणे झालं आहे. दिल्ली एनसीआरमध्ये नळाला येणारे पाणीही विषारी आहे. दिल्लीमधील हवेची आणि पाण्याची काय परिस्थिती आहे हे सर्वांना ठाऊक आहे. यामुळे आयुर्मान कमी झाले आहे. असं असताना आम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा का दिली जात आहे?,” असा सवाल अक्षयने उपस्थित केला आहे.

इतकचं नाही तर या अर्जामध्ये एका ठिकाणी वेद, पुराण आणि उपनिषदांचा संदर्भही देण्यात आला आहे. “सतयुगामध्ये मानव हजारो वर्ष जगायचा. मात्र आता कलयुगामध्ये मानवाचे आयुर्मान अगदी ५० ते ६० वर्षांपर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे आता फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात पुनर्विचार करणे गरजेचे आहे,” असा अजब युक्तीवाद अक्षयने आपल्या याचिकेमध्ये केला आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्भया बलात्काप्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असणाऱ्या विनय शर्माने केलेला दयेचा अर्ज फेटाळला आहे. राष्ट्रपती केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली सरकारने हा अर्ज फेटाळल्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती.

काय आहे निर्भया प्रकरण?

दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला. बलात्कारानंतर नराधमांनी केलेले कृत्य अत्यंत भयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारे होते. तिला उपचारांसाठी दिल्लीतील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच अधिक चांगले उपचार मिळावेत म्हणून तिला देशाबाहेर नेऊनही तिच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र ती वाचली नाही. या प्रकरणात एकूण सहा जण दोषी होते. ज्या पैकी एकजण अल्पवयीन होता. दोषी राम सिंह याने तिहार तुरुंगामध्ये आत्महत्या केली. यानंतर चार दोषींना दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांची पुनर्विचार याचिका न्यायलयाने फेटाळून लावली.