Delhi Airport : विमानात चोरी करणाऱ्या चिनी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. प्रवाशांचं साहित्य चोरणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका चिनी नागरिकाला अटक केली आहे. तसेच आरोपीकडून एक डेबिट कार्ड जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या व्यक्तीने अनेक प्रवाशांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली. तसेच या व्यक्तीच्या ३ साथीदारांनाही ताब्यात घेतलं असून ते देखील चिनी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. आता या तिघांचाही या प्रकरणात सहभाग आहे का? याची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, बेनलाई पॅन (३०) आणि त्याचे सहकारी मेंग गुआंगयांग (५१), चांग मांग (४२) आणि लिऊ जी (४५) अशी आरोपींची नावे असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

चोरी करताना दुसऱ्या प्रवाशाने आरोपीचा व्हिडीओ बनवल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. हाँगकाँगहून नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-३१५ या विमानात संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर सुरक्षा आणि दक्षता पथकाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केलं. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, १२ सी या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाचं क्रेडिट कार्ड गहाळ झालं. मात्र, ते क्रेडिट कार्ड नंतर दुसऱ्या एका सीटवर आढळलं.

अधिकाऱ्याने सांगितलं की, आणखी एका दुसऱ्या प्रवाशाने तिच्या आईचं डेबिट कार्ड गहाळ झाल्याचं सांगितलं. त्यानंतर तिसऱ्या दोन प्रवाशांनी एक व्यक्ती सामान उघडताना आणि वैयक्तिक सामानाची तपासणी करतानाचा व्हिडिओ दाखवला. त्यानंतर पोलिसांनी त्या चीनी व्यक्तीची आणि त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी केली. दरम्यान, सीआयएसएफ आणि विमान सुरक्षा यांच्याशी समन्वय साधणाऱ्या एका पोलीस पथकाकडून फुटेज तपासण्यात येत आहेत.

यावेळी चौकशी दरम्यान बेनलाई पॅनने (चिनी नागरिक) कबूल केलं की तो आणि त्याचे साथीदार आंतरराष्ट्रीय ट्रान्झिट फ्लाइट्सवर काम करणाऱ्या एका सिंडिकेटचा भाग होते, असं आयजीआय विमानतळाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त उषा रंगनानी यांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच हे चोर झोपलेल्या प्रवाशांना लक्ष्य करत असत. त्यांच्या बॅगा उघडत असत आणि त्यातील वस्तू आणि किंवा कार्ड चोरी करत असत. तसेच कार्डचा गैरवापर करत ते कार्डे टाकून देत असत, असंही त्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सीट १४ सी वर सापडलेले बँक ऑफ अमेरिका क्रेडिट कार्ड, तसेच अनेक बॅगा, पाकिट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. याची आता चौकशी करण्यात येणार असून आरोपी बेनलाई पॅनला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या तीन साथीदारांची देखील पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.